Sanjay Raut : ज्या ठिकाणी भाजपाची सत्ता आहे तिथे मागेपुढे गोष्टी होत राहणार. नायब सैनी म्हणाले की बंदोबस्त करु. मात्र हरियाणात भाजपाविरोधी लाट आहे, ही लाट मोदी आणि शाह यांच्या विरोधात आहे. तिथली जनता भाजपाला निवडून देणार नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. हरियाणात काँग्रेसचं सरकार येईल, जम्मू काश्मीर काँग्रेस अलायन्सचं सरकार येईल. मोठमोठ्या गोष्टी भाजपाकडून केल्या जात होत्या, पण काश्मीरच्या जनतेने मोदी आणि शाह यांना राज्यातून हाकललं आहे.
कुठेही निवडणूक घ्या भाजपा आणि मोदी हरणार
कुठेही निवडणूक घ्या मोदी, अमित शाह आणि भाजपा हा पक्ष हरणार. उत्तर प्रदेशात निवडणूक घ्या, गुजरातमध्ये घ्या भाजपा हरणार. मोदींचा मुखवटा, मेक अप आता उतरला आहे. हरियाणाबरोबर महाराष्ट्राची निवडणूक घेतली असती तर महाराष्ट्रातही भाजपाचा पराभव झाला असता असंही संजय राऊत म्हणाले आहेत. महाराष्ट्रात १७५ ते १८० जागा महाविकास आघाडीला मिळतील असंही संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी म्हटलं आहे.
हे पण वाचा- Sanjay Raut on CM Candidate: मुख्यमंत्रीपद आणि मविआची चर्चा, संजय राऊत काय बोलले?
निवडणूक आयोगाची वेबसाईट म्हणजे भाजपाचीच वेबसाईट
निवडणूक आयोग म्हणजे काय? ती भाजपाचीच वेबसाईट आहे त्यांनी काहीही दाखवू द्या. काही वेळात सगळं चित्र स्पष्ट होईल. पूर्ण निकाल लागत राहतील, मला खात्री आहे हरियाणाची जनता ही लढवय्या आहे. महाराष्ट्रातील जनतेप्रमाणेच ती जनता आहे असंही संजय राऊत म्हणाले. महाराष्ट्रातल्या जागावाटपाची चिंता करु नका. आम्ही व्यवस्थित जागावाटप करु, दसऱ्यापर्यंत आमचं जागावाटप होईल असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. भाजपाचा महाराष्ट्रातही पराभव होईल. जागावाटप लवकरच जाहीर होईल. महायुतीने कुठे जागावाटप जाहीर केलं आहे. आम्ही लोकसभेतही जागा जाहीर केल्या होत्या आम्ही जिंकलो होतो. आताही महाराष्ट्रात आम्ही जिंकणार आहोत. महाराष्ट्रात काय राहुल गांधी किंवा प्रियांका गांधी होणार नाही ते राष्ट्रीय नेते आहेत. इथे कुणाकडे मुख्यमंत्रिपद जाईल ते आम्हाला माहीत आहे असंही संजय राऊत ( Sanjay Raut ) म्हणाले आहेत.
महाराष्ट्राच्या जागावाटपाची चिंत नको
हरियाणात काय निकाल लागतो त्याचा परिणाम काही महाराष्ट्रातल्या जागावाटपावर होणार नाही. काँग्रेसकडे चेहरा असेल तर त्यांनी जाहीर करावा असं उद्धव ठाकरे म्हणाले होते, पाठिंबा देतो असंही म्हणाले होते. चेहरा जाहीर केला पाहिजे ही उद्धव ठाकरे आणि शिवसेनेची भूमिका आहे त्यात काही चुकीचं नाही, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. मुख्यमत्रिपदाची चर्चा दिल्लीत होते, तिथे त्यांची एक यंत्रणा आहे. आम्ही आमच्या पक्षांबाबत सांगू शकतो, आम्ही आमचा निर्णय घेऊ शकतो. काँग्रेसचे निर्णय दिल्लीत होतात कारण त्यांचं हायकमांड दिल्लीत आहे असंही संजय राऊत ( Sanjay Raut ) म्हणाले.
आमच्या पक्षात इनकमिंग वाढणार
शिवसेनेत (उद्धव ठाकरे) येत्या काळात इनकमिंग वाढलेलं दिसेल. दीपेश म्हात्रे आले आहेत त्याप्रमाणेच कल्याण, डोंबिवली, ठाणे येथील लोक आमच्या पक्षात येतील. अनेक लोक दहशतीखाली मिंधेंच्या बरोबर गेले होते, त्या लोकांना आम्ही परत घेत आहोत. येत्या काळात सगळं काही तुम्हाला कळेल असंही संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी स्पष्ट केलं.