राज्यात महायुतीमधील भारतीय जनता पक्षाची पहिली यादी जाहीर झाली असून त्यातील उमेदवारांची चर्चा पाहायला मिळत आहे. राज्यातील २० लोकसभा मतदारसंघांवर भाजपानं आपल्या उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. त्यामुळे महायुतीच्या फॉर्म्युल्यानुसार किमान २० जागा भाजपाच्या पारड्यात पडल्याचं स्पष्ट झालं आहे. राहिलेल्या २८ जागांमध्ये कुणाला किती आणि कुठे जागा मिळतात, याविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर आता विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीचंही जागावाटप पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे. ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी माध्यमांना ही माहिती दिली आहे.
महायुतीमध्ये भाजपासोबत एकनाथ शिंदे व अजित पवार हे दोन गट सहभागी झाल्यामुळे तिन्ही पक्षांमधील विद्यमान खासदार व इच्छुक उमेदवारांमध्ये चढाओढ सुरू झाल्याचं सांगितलं जात आहे. काही इच्छुकांची नाराजी झाल्याचंही बोललं जात आहे. त्याचप्रमाणे महाविकास आघाडीमध्येही उद्धव ठाकरे व शरद पवार हे दोन गट विद्यमान खासदार फुटल्यामुळे अल्पमतात आले असले तरी त्या त्या मतदारसंघात प्रभाव असल्याचा दावा दोन्ही पक्षांकडून केला जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचं जागावाटप कसं असेल? याचीही उत्सुकता कमालीची ताणली गेली असताना हे जागावाटप पूर्ण झाल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.
महायुतीची ४८ उमेदवारांची यादी तयार!
दरम्यान, यावेळी राज्यातील सर्व ४८ लोकसभा मतदारसंघांसाठी उमेदवारांची यादी तयार असल्याचं संजय राऊत म्हणाले. “महायुतीमध्ये जागावाटपाबाबत अजिबात संभ्रम नाही. ४८ मतदारसंघांची पूर्ण यादी एकत्र जाहीर केली जाईल. जागावाटप पूर्ण झालं आहे”, असं ते म्हणाले.
कलाबेन डेलकर यांना भाजपाकडून उमेदवारी देण्यात आल्याबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता त्यावरून संजय राऊतांनी डेलकर कुटुंबाला लक्ष्य केलं. “कलाबेन डेलकर यांचं नाव भाजपाच्या यादीत आहे. तरी ती जागा शिवसेना लढणार आहे. त्या संकटात असताना त्या कुटुंबाला शिवसेनेनंच साथ दिली. अशा स्थितीत त्या कुटुंबाला इमान नसेल, निष्ठा नसेल तर बघू”, असं ते म्हणाले.
भाजपाकडून रक्षा खडसेंना उमेदवारी; शरद पवार, एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसेंची बंद दाराआड चर्चा
संजय राऊत यांनी नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना राहुल गांधींच्या भारत न्याय यात्रेसंदर्भात भूमिका मांडली. “महाविकास आघाडी, इंडिया आघाडी आम्ही सगळे एक आहोत. राहुल गांधी महाराष्ट्रात आले आहेत. आज ते चांदवडमध्ये शेतकरी मेळावा घेत आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, इतर सर्व घटक पक्षांनी त्या मेळाव्यात उपस्थित राहण्याचं ठरलं आहे. १७ तारखेला मुंबईत समारोप आहे. शिवाजी पार्कवर स्वत: उद्धव ठाकरे उपस्थित राहतील. काल राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली. शिवाजी पार्कच्या मेळाव्याबाबत ते बोलले. राहुल गांधींनी उद्धव ठाकरेंना खास निमंत्रण दिलं आहे. आज नाशिकमध्ये शिवसेना मोठ्या उत्साहात त्यांचं स्वागत करणार आहे”, असं संजय राऊत म्हणाले.