पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील एका सभेला संबोधित करताना महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि अल्पसंख्यांकांवरून केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. “देशात काँग्रेसची सत्ता आली तर ते लोक तुमची संपत्ती, मौल्यवान वस्तू आणि हिंदू महिलांच्या गळ्यातलं मंगळसूत्रं जास्त मुलांना जन्म घालणाऱ्यांना दिली जातील”, असं वक्तव्य मोदी यांनी केलं होतं. तर अलीगढमधील सभेत मोदी म्हणाले, “कोण किती रुपये कमावतो, कुणाकडे किती संपत्ती आहे, किती घरं आणि जमीन आहे, याचा तपास केला जाईल, असं काँग्रेसचा राजकुमार म्हणतो. तो पुढे म्हणतो की, सरकार अशा श्रीमंतांच्या संपत्तीचा ताबा घेईल आणि ती संपत्ती सर्वांना वाटून टाकली जाईल. आपल्या माता-भगिनींकडे असलेलं सोनं जे स्त्रीधन मानलं जातं तेदेखील घेतलं जाईल. तुमच्या मंगळसूत्रावरही त्यांचा डोळा आहे. ही गोष्ट फारच लज्जास्पद आहे.”
मोदी यांच्या या वक्तव्यावरून शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्यांना काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी केलेल्या ‘वारसा करा’बाबतच्या वक्तव्यावर प्रश्न विचारल्यावर राऊत म्हणाले, सॅम पित्रोदा यांनी जे वक्तव्य केलंय त्याबाबत काँग्रेसने त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. काँग्रेसने सांगितलं आहे की ते सॅम पित्रोदा यांचं व्यक्तिगत मत आहे. त्यांच्या भूमिकेशी काँग्रेसचा कसलाही संबंध नाही. तसंच जर असेल तर नरेंद्र मोदी आता आपल्या देशातील बायकांच्या मंगळसूत्रांना हात घालू लागले आहेत, पाकीटमारी करू लागले आहेत ती भाजपाची भूमिका आहे का? खरं म्हणजे काँग्रेसच्या राज्यात नव्हे तर मोदींच्या राज्यात बायकांची मंगळसूत्रं गहाण पडू लागली आहेत, मंगळसूत्रं लुटली जात आहेत. हा माणूस आता मंगळसूत्राच्या गोष्टी करतोय. जो माणूस स्वतःच्या घरातल्या मंगळसूत्राला प्रतीष्ठा देऊ शकला नाही त्याने दुसऱ्यांच्या मंगळसूत्रांची उठाठेव करू नये.
नरेंद्र मोदींमुळे या देशातल्या कित्येक महिलांची मंगळसूत्रं लुटली गेली आहेत. मोदींनी नोटबंदी आणल्यामुळे लाखो महिलांना आपली मंगळसूत्रं गहाण ठेवून घर चालवावं लागलं. नरेंद्र मोदींनी जो लॉकडाऊन लावला त्या लॉकडाऊनच्या काळात हजारो लोकांचे रोजगार गेले, त्या काळात आपलं घर चालवण्यासाठी अनेक महिलांनी मंगळसूत्रं विकली. या देशातल्या बेरोजगार तरुणांच्या मातांना आपलं घर चालवण्यासाठी मंगळसूत्रं गहाण ठेवावी लागली आहेत, अशी किती उदाहरणं द्यावी.
हे ही वाचा >> अमोल कोल्हेंविरोधात शिरूरमधून लोकसभेची ऑफर होती? भुजबळ म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी मला…”
संजय राऊत म्हणाले, जम्मू काश्मीरमधील काश्मिरी पंडितांच्या पत्नींची मंगळसूत्रं देखील मोदींमुळेच गेली. मोदीपुरस्कृत, भाजपा पुरस्कृत दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडितांचे जीव घेतले. त्यामुळे त्या महिलांची मंगळसूत्रं गेली. मणिपूरमधील कित्येक महिलांनी आपली मंगळसूत्रं गमावली. या सगळ्याला जबाबदार कोणी असेल तर ते नरेंद्र मोदी आहेत. आतापर्यंत किती मंगळसूत्रांची प्रतिष्ठा मोदींनी ठेवली आहे ते मला सांगा. या देशात मंगळसूत्रांवर गंडांतर आलं असेल तर ते केवळ मोदींमुळे आलं आहे.