karnataka Nivadnuk 2023 : आरोप प्रत्यारोप, प्रचारांचा धडाका, सभांचा धुरळा उडाल्यानतंर आज अखेर कर्नाटकात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. कर्नाटकातील २२४ मतदारसंघासाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. महाराष्ट्राच्या सीमेला असणाऱ्या बेळगावातही १८ मतदारसंघासाठी आज मतदान होणार आहे. दरम्यान, आजच्या मतदानासाठी ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी ट्वीट करत महाराष्ट्र सरकारवर तोफ डागली आहे.
“आज कर्नाटक राज्यात विधान सभा निवडणुका होत आहेत. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा यांनी घाम आणि पैसा गाळून देखील भाजपचा दारुण पराभव होत आहे. हा 2024साठी शुभ शकुन आहे”, असं संजय राऊत ट्वीटमध्ये म्हणाले आहेत. ते पुढे म्हणाले की, “दुःख इतकेच की महाराष्ट्राचे सध्याचे मिंधे राज्यकर्ते यांनी आपल्या सीमा भागात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पराभवासाठी कारस्थाने केली. स्वतःला शिवसेना म्हवणून घेणारे मुख्यमंत्री साहेबांनी मंगलोर मार्गे काही खोके बेळगावात पाठवून एकीकरण समितीच्या उमेदवारांचा पराभव करण्यासाठी शर्थ केली. महाराष्ट्राशी ही गद्दारीच आहे..मराठी माणूस हे लक्ष्यात ठेवील. जय महाराष्ट्र!”
कर्नाटकात निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच संपूर्ण देशाचं लक्ष त्या एका राज्यापुरतं केंद्रीत झालं होतं. कर्नाटकातील निकालानंतर आगामी विधानसभा निवडणुकांचा निकाल स्पष्ट होईल, असं राजकीय तज्ज्ञ म्हणतात. त्यामुळे सर्वच पक्षीयांनी या निवडणुकीला प्रचंड महत्त्व दिलं आहे. भाजपाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोड शो केले. तर, काँग्रेसकडून राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनीही प्रचाराचा धडाका उडवून दिला. इतर पक्षांनीही आरोप प्रत्यारोप करत, आश्वासनांची खैरात करत दणक्यात प्रचार केला. दरम्यान, सत्तारुढ भाजपा, विरोधी पक्ष काँग्रेस, निजद, सीपीआयएम, आप आणि अपक्ष उमेदवार यांचं भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे.
महाराष्ट्रातील नेते कर्नाटकात
कर्नाटकची निवडणूक महाराष्ट्रातही बेळगावसाठी महत्त्वाची आहे. बेळगावातील मराठी भाषिक जनतेसाठी महाविकास आघाडीने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला. ठाकरे गटाचे संजय राऊत, काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बेळगावात मराठी माणसासाठी प्रचार केला. तर, भाजपाकडून देवेंद्र फडणवीस, चित्रा वाघ यांनी जाहीर सभा घेतल्या. या सर्व पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी हे ट्वीट केलं आहे. त्यामुळे आज मतदानाचा दिवस सर्वच पक्षांसाठी अत्यंत महत्त्वचा मानला जात आहे.