Sanjay Raut On Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीनंतर पुढील पाच वर्षे राज्याची सूत्रे महायुतीच्या हाती असणार हे स्पष्ट झाले आहे. आता महायुतीमधील घटक पक्षांत मुख्यमंत्रीपद आणि मंत्रीपदाचे वाटप यावर खलबतं सुरू आहेत. एकीकडे सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे आमदार देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत म्हणून आग्रही आहेत. तर, दुसरीकडे शिवसेनेच्या आमदारांना पुन्हा एकदा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील अशी आशा आहे.
दरम्यान शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी आज भाजपा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली आहे. यावेळी संजय राऊत म्हणाले की, “एकनाथ शिंदे आतापर्यंत घटनाबाह्य मुख्यमंत्री होते, पण जर त्यांनी आता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर ते घटनेनुसार या पदावर असतील.”
काय म्हणाले संजय राउत?
आज प्रसार माध्यमांशी बोलताना शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत म्हणाले, “जरी घटनाबाह्य असले तरी ते आज संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्री आहेत. ते आणि त्यांची लोकं आता नव्यानं निवडून आली आहेत. आता जर ते मुख्यमंत्री झाले तर ते घटनेनुसार होतील. पण आज संध्याकाळ पर्यंत ते घटनाबाह्य मुख्यमंत्रीच असतील.”
हे ही वाचा: धनंजय मुंडे यांच्यावर धक्कादायक आरोप करणाऱ्या करुणा मुंडे यांना मिळाली ‘एवढी’ मते
अडीच वर्षांचा फॉर्म्युला
यावेळी संजय राऊत यांना महायुतीच्या संभाव्य अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्याबाबत विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले, “२०१९ मध्ये आम्ही त्यांना अडीच वर्षांच्या फॉर्म्युलाबाबत सांगत होतो तेव्हा त्यांना हे मान्य नव्हते. जर अडीच वर्षाचा फॉर्म्युला मान्य केला असता तर पुढच्या अनेक घडामोडी टळल्या असत्या. पण फक्त उद्धव ठाकरे यांना आणि शिवसेनाला त्रास द्यायचा होता, तसेच पक्ष फोडायचा होता म्हणून तेव्हा अडीच वर्षांचा फॉर्म्युला पाळला नाही. पण आता ते सर्वकाही करायला तयार आहे. याच्यातून लक्षात घ्या की, त्यांना महाराष्ट्र आणि शिसेनेविषयी किती द्वेष आहे.”
महायुती सुसाट तर महाविकास आघाडीला धक्का
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने २३५ जागा जिंकल्या तर महाविकास आघाडीच्या वाट्याला अवघ्या ५० जागा आल्या. यामध्ये भाजपाने १३२, शिवसेनेने ५७ आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ४१ जागा जिंकल्या आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीत शिवसेना (ठाकरे गट) २०, काँग्रेस १६, राष्ट्रवादी (शरद पवार) १०, समाजवादी पक्ष २ आणि शेतकरी कामगार पक्षाने १ जागा जिंकली आहे.