शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. एकनाथ शिंदे हे मतदानाच्या आदल्या दिवशी पैशांनी भरलेल्या बॅगा घेऊन नाशिकमध्ये गेले होते. त्यांनी ते पैसै मतदारांना वाटण्यासाठी पक्षातील संबंधित लोकांना सुपूर्द केले, असा आरोप राऊत यांनी केला आहे. राऊत यांच्या या आरोपांवर शिवसेनेच्या शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी उत्तर दिलं आहे. शिरसाट म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे असणाऱ्या बॅगांमध्ये कपडे होते.

आमदार संजय शिरसाट म्हणाले, कोणताही नेता असो, उद्धव ठाकरे असो अथवा शरद पवार, ते कोणत्याही कार्यक्रमाला जाताना त्यांच्याबरोबर कपड्यांच्या एक-दोन बॅगा घेऊन जातातच. कारण हे नेते गर्दीत जातात, लोकांना भेटतात. एखाद्या ठिकाणी शर्ट फाटणं किंवा खराब होण्याच्या घटना घडतात. त्यामुळे त्याची पूर्वतयारी म्हणून हे नेते कपड्यांच्या एक-दोन बॅगा आपल्याबरोबर घेऊन जातात. कोणताही नेता एका ठिकाणाहून निघून दुसऱ्या ठिकाणी गेला तर दरम्यानच्या काळात कपडे खराब होतात. त्यामुळे हे नेते कपड्यांची काळजी घेतात.

शिंदे गटाचे प्रवक्ते शिरसाट म्हणाले, उद्धव ठाकरे संभाजीनगरला येताना किती बॅगा घेऊन आले होते हे तुम्हाला (प्रसारमाध्यमांना) माहिती आहे का? प्रसारमाध्यमांनीदेखील ते पाहिलं असेल. परंतु, आम्ही त्यांच्यावर काही आरोप केले नाहीत. या बॅगांवरून पैशांचा आरोप करणे हा संजय राऊत यांचा नवा जावईशोध आहे. आपण किती बेअ** आहोत हे ठासून सांगण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे.

संजय राऊत म्हणाले होते की, सत्ताधारी नेते निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा पाऊस पाडतायत. यावर संजय शिरसाट म्हणाले, पैशांचा पाऊस पाडून कुठलीही व्यक्ती निवडणूक जिंकू शकत नाही. असं जर असतं तर माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस आमदार झाला नसता. पैशांच्या पावसाने निवडणुका जिंकता येत असत्या तर टाटा-बिर्ला पंतप्रधान झाले असते. खरंतर निवडणुकीतील आपला पराभव दिसू लागल्यावर त्यांनी आतापासूनच कारणं सांगायला सुरुवात केली आहे.

हे ही वाचा >> “मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमधून नाशकात उतरवल्या नऊ बॅगा”, VIDEO शेअर करत संजय राऊत म्हणाले, “त्यामध्ये तब्बल…”

आमदार शिरसाट म्हणाले, त्यांना कळून चुकलंय की महाविकास आघाडीचं या निवडणुकीत काही खरं नाही. त्यामुळे एका बाजूला सांगायचं, हे लोक (महायुती) पैसे वाटत आहेत, राजकीय दबाव निर्माण करत आहेत, ईव्हीएममध्ये गडबड करत आहेत. ही सगळी त्यांची पुढची कारणं आत्ताच तयार करून ठेवत आहेत. उद्या निवडणुकीत पराभूत झाल्यावर सांगतील, आम्ही तर आधीच सांगितलं होतं, यांनी पैसे वाटले आहेत, ईव्हीएममध्ये गडबड केली आहे. निवडणुकीत हरण्यासाठी काय काय कारणं असू शकतात, त्यावर विचार करून आत्तापासूनच हे लोक बोलू लागले आहेत. ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागेल आणि त्या दिवशी ते लोक हीच वाक्य बोलतील.

Story img Loader