Satara Assembly Constituency Maharashtra Assembly Election 2024: सातारा जिल्ह्यावर एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्या खालोखाल काँग्रेसचे वर्चस्व होते. मात्र २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत आणि त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीत झालेल्या फुटीनंतर महायुतीचे जिल्ह्यातील प्रस्थ वाढले आहे. राष्ट्रवादीकडे असलेला सातारा विधानसभा भाजपाकडे तर वाई मतदारसंघाचे आमदार राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षात आहेत. २०१९ च्या आधी सातारा विधानसभेचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांनी कमळ चिन्हावर निवडणूक लढविली होती.
सातारा विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या शिवेंद्रराजे भोसले यांनी यंदा सलग पाचव्यांदा विजय मिळविला आहे. शिवेंद्रराजे भोसले यांना १,७६,८४९ एवढी मते मिळाली. महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्य मिळविण्याचा विक्रम त्यांच्या नावावर नोंद झाला आहे. त्यांनी तब्बल १,४२,१२४ एवढे मताधिक्य मिळविले. शिवसेना (ठाकरे) पक्षाचे उमेदवार अमित कदम यांना केवळ ३४,७२५ एवढी मते मिळाली.
सातारा विधानसभेचा राजकीय इतिहास
सातारा विधानसभा मतदारसंघ सुरुवातीला काँग्रेसच्या ताब्यात होता. १९६२ ते १९७२ पर्यंत धोंडीराम जगताप काँग्रेसच्या तिकीटावर निवडून येत होते. १९७८ साली अभयसिंह राजे भोसले (शिवेंद्रराजे भोसले यांचे वडील) यांनी जनता पक्षाच्या तिकीटावर येथे विजय मिळविला. त्यानंतर १९८० पासून ते १९९५ पर्यंत ते लागोपाठ चार वेळा याठिकाणी निवडून येत होते. १९९८ साली पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले यांनी भाजपाच्या तिकीटावर याठिकाणी विजय मिळविला. १९९९ साली झालेल्या निवडणुकीत अभयराजे भोसले यांचे पुनरागमन झाले. तर त्यानंतर २००४ पासून शिवेंद्रराजे भोसले याठिकाणी जिंकून येत आहेत.
हे वाचा >> Patan Assembly Constituency: पाटण विधानसभेमध्ये देसाई की पाटणकर? मविआकडून उमेदवार कोण?
शिवेंद्रराजे भोसले सातारा विधानसभेचे आमदार झाल्यापासून त्यांच्या तोडीस तोड उमेदवार याठिकाणी इतर पक्षांना लाभलेला नाही. भाजपाचे दीपक पवार हे त्यांना झुंज देत होते. मात्र स्वतः शिवेंद्रराजे भोसलेच भाजपावासी झाल्यामुळे दीपक पवार यांनी २०१९ साली राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरली. दीपक पवार यांना राष्ट्रवादीने शिवेंद्रराजे भोसले यांच्या विरोधात उभे केले. दीपक पवार यांना २०१४ पेक्षा जास्त मते मिळाली. मात्र तरीही त्यांचा मोठ्या मताधिक्क्याने पराभव झाला.
हे ही वाचा >> Karad South Assembly Constituency: कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण हॅटट्रिक साधणार की भाजपा झेंडा रोवणार?
२०१९ च्या विधानसभेचा निकाल
१) शिवेंद्रराजे भोसले (भाजपा) – १,१८,००५
२) दीपक पवार (राष्ट्रवादी) – ७४,५८१
३) अशोक गोरखनाथ दीक्षित (वंचित) – ३१५३
२०१४ च्या विधानसभेचा निकाल
१) शिवेंद्रराजे भोसले (राष्ट्रवादी) – ९७,९६४
२) दीपक पवार (भाजपा) – ५०,१५१
३) दगडू सकपाळ (शिवसेना) – २५,४२१
सातारा विधानसभेत उमेदवार कोण?
सातारा विधानसभेसाठी २७ जणांनी अर्ज भरला होता. त्यापैकी २३ जणांचे अर्ज पात्र ठरले आहेत. यात आणखी काही उमेदवार अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाकडून अमित कदम, अभिजीत बिचुकले यांनी अपक्ष अर्ज सादर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने या मतदारसंघावरील आपला दावा सोडला असून उबाठाला मतदारसंघ देऊ केला आहे.
ताजी अपडेट
सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवेंद्रराजे भोसले यांच्या विजयासाठी त्यांचे बंधू आणि साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले आणि महायुतीचे सर्व नेते एकत्र आले आहेत. शिवेंद्रराजे भोसले यांच्या विजयासाठी उदयनराजे भोसले प्रचार सभा घेत नसून फिल्मी स्टाईलने डॉयलॉग मारत ते मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. नुकतेच एका प्रचार सभेत त्यांनी शिवेंद्रराजे यांच्याकडे पाहत ‘झुकेगा नही साला’ असा डायलॉग मारला आणि आपली कॉलर उडवली.
शिवेंद्रराजे भोसले यांनी प्रचारात आघाडी घेतली असून मराठा समाजासह इतर समाजांनाही आवाहन केले आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी सामान्य घरातील अमित कदम यांना निवडून देण्याचे आवाहन केले आहे. “तुम्हाला घराणेशाही पाहीजे की साध्या घरातला, तुमच्यातला आणि तुमच्या हाकेला कधीही ओ देणारा असा अमित पाहीजे, हे तुम्हीच ठरवा”, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले.
मतदानाची टक्केवारी किती?
सातारा विधानसभा मतदारसंघ हा सातारा जिल्ह्यात येतो. सातारा जिल्ह्यात ६४.१६ टक्के मतदान झाले. सातारा विधानसभेत सर्वात कमी ६३ टक्के मतदान झाले.