Abhijeet bichukale total votes: महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने एकतर्फी विजय मिळवला आहे. महायुतीने आतापर्यंत २२९ जागांवर आघाडी घेतली असून शिवसेना (एकनाथ शिंदे) ५६, आणि राष्ट्रवादी पक्ष (अजित पवार) ४० उमेदवार आघाडीवर आहेत. दरम्यान, विजय जवळपास निश्चित झाला असून महायुतीची सत्ता स्थापन होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान यंदाच्या निवडणुकीत ‘बिग बॉस’ फेम अभिजीत बिचुकले यांनीदेखील उमेदवार म्हणून अर्ज भरला होता. आमदारकीपासून देशाच्या राष्ट्रपतीपदापर्यंत निवडणूक लढवून चर्चेत असणारे अभिजीत बिचुकले चौथ्यांदा सातारा जावळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. तसेच, पवार विरूद्ध पवार अशी चर्चेतील लढत असलेल्या बारामतीतूनही ते उभे होते. दोन्ही ठिकाणी त्यांचा पराभव झाला. पाहूया त्यांनी किती मते मिळाली.
बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांच्यात मुख्य लढत होती. त्यानंतर बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी बारामती विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आणि एकच चर्चा रंगली. पवार विरुद्ध पवार लढतीमध्ये अभिजीत बिचुकले यांनी उडी घेतली. राज्यात अनेक ठिकाणी निवडणुका लढवल्यानंतर अभिजीत बिचुकले यांनी आपलं नशीब आजमावलं आहे. मात्र राष्ट्रपती बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अभिजीत बिचुकलेंना आमदारही बनता आलेलं नाहीये.
साताऱ्यात अभिजीत बिचुकले सहाव्या क्रमांकावर
सातारा मतदारसंघात भाजपाच्या तिकीटावर शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी निवडणूक जिंकली. त्यांनी तब्बल १,४२,१२४ मतांच्या फरकाने निवडणूक जिंकली. त्यांची लढत शिवसेनेचा उद्धव ठाकरे गटाचे अमित कदम यांच्याविरोधात होती. शिवेंद्रराजे यांना एकूण १,७६,८४९ मते मिळाली तर दुसऱ्या क्रमांकाच्या अमित कदम यांना ३४,७२५ मतांवर समाधान मानावे लागले. या यादीत सहाव्या क्रमांकावर असलेल्या डॉ. अभिजीत आवाडे-बिचुकले यांना एकूण ५२९ जागा मिळाल्या.
हेही वाचा >> Maharashtra Election 2024: “बॅलेट पेपरवर पुन्हा निवडणूक घ्या! हा निकाल मान्य नाही” ठाकरेंच्या मोठ्या नेत्याची मागणी
बारामतीत अभिजीत बिचुकलेंचे डिपॉझिट जप्त
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यापासून पवार विरूद्ध पवार असे दोन सामने झाले. त्यात पहिल्या सामन्यात सुप्रिया सुळेंच्या विजयासह शरद पवार गट वरचढ ठरला होता. यावेळी अजित पवार विरूद्ध युगेंद्र पवार असा सामना रंगला होता. यात शरद पवार गटाच्या युगेंद्र पवारांना ७९,०६४ मते मिळाली. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना १,७८,१०९ मते मिळाली. या मतदारसंघातही अभिजीत बिचुकले यांना काहीही प्रभाव पाडता आला नाही. अभिजीत बिचुकले यांना साधी शंभरीही गाठता आली नाही. त्यांना अवघी ९४ मते मिळाली.