देशपातळीवर फोडाफोडी करण्याचं पेटंट भाजपाकडे आहे. भाजपाने पक्ष फोडण्याचा ट्रेडमार्क घेतला आहे. हा ट्रेडमार्क दुसऱ्या कुणाला लागू होऊ शकत नाही असं म्हणत सतेज पाटील यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. तसंच भाजपा देशपातळीवर २१४ जागांच्या पुढे जात नाही असंही ते म्हणाले आहेत.
कार्यकर्त्यांना गाजर दाखवावं लागतं
भाजपाची बिहार आणि दक्षिण बारतात काय अवस्था होणार ही आकडेवारी समोर आहे. मात्र कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी चारशे पारचा नारा द्यावा लागतो. भाजपा देशपातळीवर २१४ च्या पुढे जाणार नाही. कार्यकर्त्यांना गाजर दाखवावं लागतं आहे. चंद्रकांत पाटील प्रयत्न करत आहेत. कोल्हापूरमध्ये मोदी, योगी आदित्यनाथ, अमित शाह प्रचाराला आले तरीही त्याचा परिणाम होणार नाही.
शाहू महाराजच जिंकतील ही खात्री
कोल्हापूरची अस्मिता शाहू महाराजांच्या रुपाने दिल्लीला पाठवायची आहे. लोकांच्या मनात काँग्रेस आणि शाहू महाराज हे नक्की झालं आहे. कोल्हापूरच्या जनतेने ठरवलं आहे की खासदार बदला, परिस्थिती बदलेल. पाच वर्षात संजय मंडलिक करू शकले नाहीत म्हणून ते आता टीका करत आहेत. याच अजिंक्यताराचा रोल २०१९ मध्ये काय होता? अशी विचारणाही सतेज पाटील यांनी केली. लोकांच्या मनामध्ये महाराजांबद्दल असलेली आपुलकी आणि प्रेम ते काढू शकत नाहीत. चंद्रकांतदादा यांचा राजकारणाचा अभ्यास जास्त आहे, पुण्यात हू इज धंगेकर म्हटले होते त्याचा परिणाम पुढे पाहायला मिळाला असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.
राज ठाकरेंवर टीका
राज ठाकरेंनी मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला याचं आश्चर्य वाटतं. राज महायुतीमध्ये जाऊन दोन-चार जागा लढवतील असं वाटलं होतं. मात्र, निवडणूकच लढवायची नाही ही भूमिका मनसेच्या कार्यकर्त्यांना देखील मान्य झाली असेल असं वाटत नाही. राज ठाकरे यांच्यामध्ये इतकं का परिवर्तन झालं हे कळायला मार्ग नाही. महाराष्ट्रात फोडाफोडीचे राजकारण झालं त्यावेळी राज ठाकरे यांची वक्तव्य संपूर्ण जनतेने ऐकली आहेत. महाराष्ट्रातील गढूळ वातावरणाचा समाचार राज ठाकरे यांनी घेतला होता. मात्र, राज ठाकरे यांनी यू टर्न घेतल्यामुळे जनतेमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाल्याचे ते म्हणाले.