लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा संपून, दुसरा टप्पा तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. तरीही महाराष्ट्रात महायुतीचा जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. महायुतीतले पक्ष काही जागांबाबत अद्याप निर्णय घेऊ शकलेले नाहीत. तसेच ज्या जागांचं वाटप झालंय त्यापैकी काही जागांवर महायुतीतल्या पक्षांना उमेदवार ठरवता आलेला नाही. महायुतीत मुंबईतील उत्तर-पश्चिम मतदारसंघ शिंदे गटाच्या वाट्याला आला आहे. मात्र शिंदे गटाकडे या मतदारसंघात तगडा उमेदवार नसल्याची टीका होत आहे. अशातच शिंदे गट आमदार रवींद्र वायकर यांना या मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहे. वायकर समर्थकांच्या मते त्यांचं लोकसभेचं तिकीट पक्कं झालं आहे. तसेच वायकरांनी मतदारसंघात मोर्चेबांधणी करण्यास सुरुवातदेखील केली आहे. दुसऱ्या बाजूला काँग्रेसने पक्षातून हकालपट्टी केलेले संजय निरुपम लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी भाजपा आणि शिंदे गटाचं दार ठोठावत असल्याची चर्चा आहे. दुसऱ्या बाजूला लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसेने या दोन्ही नेत्यांवर आक्षेप घेतला आहे. तसेच निवडणुकीत यांना तिकीट मिळालं तर मनसेचा यांना पाठिंबा नसेल, असं जाहीर केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की मनसेला ‘धनुष्यबाण’ चिन्हावर निवडणूक लढायला सांगणार्‍यांवर दुसर्‍या पक्षातून उमेदवार आयात करण्याची नामुष्की ओढवली आहे. लक्षात ठेवा, राज ठाकरे यांनी केवळ देशाला सक्षम नेतृत्व मिळावं यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला आहे. इकडून तिकडून पालापाचोळ्यासारखा उडत आलेला महाराष्ट्रद्रोही संजय निरुपम आणि भ्रष्टाचारी रवींद्र वायकरांसारख्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र सैनिकांचा पाठिंबा गृहित धरू नये.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेल्या महिन्यात दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपाचे वरिष्ठ नेते अमित शाह यांची भेट घेतली होती. या भेटीची महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच चर्चा झाली. मनसे आता महायुतीत सहभागी होणार, अशा चर्चांना जोर आला होता. तसेच मनसे महायुतीत सहभागी होऊन महाराष्ट्रात लोकसभेच्या किमान दोन जागा लढवू शकते, असं बोललं जात होतं. मात्र मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं की, त्यांचा पक्ष लोकसभा निवडणूक लढवणार नाही. मात्र मोदींसारखं नेतृत्व देशाला मिळावं यासाठी मी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत आहे.

हे ही वाचा >> “रोहितच्या उमेदवारीला शरद पवारांचा विरोध, पण मीच…”, अजित पवारांच्या दाव्यावर रोहित पवार म्हणाले…

दरम्यान, राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं की, त्यांना भाजपाकडून कमळ चिन्हावर आणि शिवसेनेच्या शिंदे गटाकडून धनुष्यबाण चिन्हावर उमेदवार उभे करण्याची ऑफर होती. मात्र आपण त्यास नकार दिल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं. राज ठाकरे म्हणाले, मनसेचं रेल्वेइंजिन हे पक्षचिन्ह मी महाराष्ट्र सैनिकांच्या कष्टाने कमावलं आहे. हे चिन्ह माझ्याकडे आयतं आलेलं नाही. सहज आलंय चिन्ह म्हणून मी त्यावर लढायचं असं अजिबात नाही. पक्षचिन्हाबाबत कसलीही तडजोड केली जाणार नाही.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shalini thackeray says mns wont support ravindra waikar sanjay nirupam in loksabha asc