लोकसभेची रणधुमाळी सध्या चांगलीच चर्चेत आहे. तिसऱ्या टप्प्याच्या मतदानाची प्रतीक्षा आहे. अशात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रंगल्या आहेत. शरद पवार आणि अजित पवार यांच्यातही आरोप-प्रत्यारोप होत आहेत. इंदापूरच्या भाषणात अजित पवारांनी पहाटेच्या शपथविधी आधी काय काय घडलं होतं? ते सगळं सांगितलं आहे.
ही निवडणूक भावकीची नाही
“भावांनो, ही निवडणूक गावकी किंवा भावकीची निवडणूक नाही. देशाचा पंतप्रधान आपल्याला निवडायचा आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान हवेत की राहुल गांधी हा निर्णय घेण्याची ही निवडणूक आहे हे विसरु नका. वेळ कमी उरलेला आहे त्यामुळे दुपारच्या उन्हात सभा घ्यावी लागते आहे. आपण प्रचंड संख्येने उपस्थित राहिले आहात त्याबद्दल मी स्वागत करतो, आभार मानतो. बऱ्याच जणांना हा प्रश्न आहे की अजित पवारांनी हा निर्णय का घेतला. आपण सगळ्यांनी माझी कारकीर्द पाहिली आहे. १९८४ मध्ये भवानीमाता पॅनल केलं होतं तिथे मला संचालक केलंत. तिथून माझी राजकीय सुरवात झाली. राजकारणात येईन असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. कारण एक घाव दोन तुकडे हा माझा स्वभाव आहे.” असं अजित पवार म्हणाले.
हे पण वाचा- ‘२०१९ ला भाजपासह जायचं शरद पवारांनी कसं ठरवलं होतं?’ अजित पवारांनी सांगितल्या पडद्यामागच्या सगळ्या घडामोडी
२०१९ ला भाजपाबरोबर जायचं हे शरद पवारांनीच ठरवलं होतं
“२०१९ ला भाजपाबरोबर पाच ते सहा मिटिंग झाल्या होत्या. तिथे सगळं ठरलं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, मी उपमुख्यमंत्री कुठली खाती कुणाला? पालकमंत्री कोण? हे ठरलं होतं. अमित शाह यांनी मला तेव्हा बाजूला घेतलं आणि म्हणाले हे बघ अजित पहिला तुमचा अनुभव काही बरा नाही. तुझ्या देखत जसं ठरलं तसं तुला वागावं लागेल. मी त्यांना शब्द दिला हो मी तसंच वागणार. मला काय माहीत काय होणार? मी त्यांना शब्द दिला. इतकं सगळं ठरल्यानंतर मी मागे कशाला फिरु?” असं मी अमित शाह यांनी म्हटल्याचं अजित पवार म्हणाले.
मुंबईत आल्यावर शरद पवारांनी सांगितलं आपल्याला शिवसेना राष्ट्रवादीबरोबर जायचं
अजित पवार पुढे म्हणाले, “आम्ही अमित शाह यांच्या भेटीनंतर मुंबईत आलो. त्यानंतर आम्हाला साहेबांनी (शरद पवार) सांगितलं की शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचं सरकार करायचं आहे. मी म्हटलं अहो त्यांना (भाजपाला) आपण शब्द दिलाय. तर मला म्हणाले हे आपलं धोरण आहे. मी गप्प राहिलो.”
शरद पवार आणि खरगेंचा खटका उडाला आणि..
“काँग्रेस आणि शिवसेनेसह बैठका सुरु असताना नेहरु सेंटरच्या बैठकीत खरगे आणि शरद पवार यांचा काहीतरी खटका उडाला. खरगे काहीतरी बोलले साहेब चिडले आणि बाहेर गेले. त्यानंतर मला त्यांनी बोलवून घेतलं सांगितलं ‘अजित तू आणि प्रफुल पटेल यांना सगळ्या गोष्टी माहीत आहेत.’ हे काँग्रेसवालले काही आपल्या बरोबर राहात नाहीत असं दिसतंय ठरल्याप्रमाणे काय ते करा. मी वर्षावर जायचं ठरवलं आणि म्हटलं ठरलंय तसं करतो. तेवढ्यात जयंत पाटील आले मला म्हणाले कुठे चाललात? तर मी त्यांना सांगितलं वर्षावर चाललो आहे जे ठरलंय त्याप्रमाणे करतो. तर मला जयंतराव म्हणाले ठरलंय तसं करा पण दाराला थोडी फट ठेवा. मी बरं म्हटलं. त्यानंतर मी गेलो, राष्ट्रपती राजवट त्यांना आणायला लावली होती. राष्ट्रपती राजवट होती ती उठवली. पण सकाळी आठला आम्ही शपथ घेतली. पुन्हा सूत्रं फिरवली. सगळे आमदार परत तिकडे (शरद पवारांकडे) गेले. काँग्रेस तेव्हा सुप्रीम कोर्टात गेला होता. त्यानंतर गुप्त मतदान सोडून उघड मतदान करायला लावलं त्यामुळे ते सरकार गेलं. मला नंतर उपमुख्यमंत्री केलं कारण सगळ्यांची ती मागणी होती.” असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.