Sharad Pawar did Mimicry of of Ajit Pawar : बारामती विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार युगेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित एका सभेत बोलत असताना ज्येष्ठ नेते व या पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नक्कल करत त्यांना चिमटा काढला आहे. शरद पवारांनी अजित पवारांची नक्कल करत त्यांनी सहा महिन्यांपूर्वी केलेल्या टीकेला जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे. शरद पवारांनी यावेळी अजित पवारांची डोळे पुसतानाची नक्कल करून दाखवली. त्यानंतर सभेला उपस्थित लोकांमध्ये एकच हशा पिकला होता. युगेंद्र पवार यांच्या प्रचारसभेतून शरद पवारांनी थेट अजित पवारांना लक्ष्य केलं.
“सहा महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीवेळी अजित पवार यांनी केलेली भाषण आठवून पहा”, असं शरद पवार म्हणाले. पवारांनी जनतेला आठवण करून दिली की “अजित पवारांनी काही महिन्यांपूर्वी दावा केला होता की साहेब (शरद पवार) तुम्हाला भावनिक करतील, डोळ्यात पाणी आणून मत द्या म्हणतील, मात्र कालच्या सभेत त्यांनी काय केलं ते सर्वांनीच पाहिलं आहे”, असं शरद पवार म्हणाले.
हे ही वाचा >> Sharad Pawar : “मला दिवसभर उभं करून…”, शरद पवारांनी सांगितलं पक्षफुटीनंतर सर्वोच्च न्यायालयात काय घडलेलं?
अजित पवार यांनी काल बारामतीमध्ये सभा घेतली होती. यावेळी युगेंद्र पवार यांच्या उमेदवारीबद्दल बोलताना अजित पवार यांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. बोलताना त्यांचा कंठ दाटून आला होता, त्यांनी आवंढा गिळला, भाषण थांबवलं, पाणी प्यायले आणि त्यानंतर त्यांनी आपलं भाषण चालू ठेवलं. अजित पवारांच्या याच कृतीवरून शरद पवारांनी आज त्यांना चिमटा काढला.
हे ही वाचा >> अकोला : काँग्रेसने साजिद खान यांच्यावरच दाखवला विश्वास, नाराज नेत्याने धरली ‘वंचित’ची वाट
शरद पवार नेमकं काय म्हणाले?
शरद पवार म्हणाले, “सहा महिन्यांपूर्वी सुप्रियाची (खासदार सुप्रिया सुळे) निवडणूक होती. त्यावेळेला (लोकसभा निवडणूक) त्यांच्या विरोधात सुनेत्रा पवार उभ्या होत्या. त्यावेळी त्यांच्या नेत्यांची (अजित पवार) भाषणं काय होती ती आठवून पाहा. त्यांचे नेते म्हणाले होते, साहेब (शरद पवार) येतील, तुमच्या भावनेला हात घालतील, भावनाप्रधान होतील, मात्र तुम्ही (जनतेनेः भावनाप्रधान होऊ नका. साहेब डोळ्यात पाणी आणतील आणि मतं मागतील. परंतु, तुम्ही भावनाप्रधान होऊन मत देऊ नका. त्यांच्या नेत्यांनी त्या सभेतून मलाही सल्ला दिला होता. मात्र त्याच नेत्यांचं कालच्या सभेतील भाषण आठवून पाहा. कालच्या सभेत ते नेते काय बोलले ते पाहा”. त्यानंतर शरद पवारांनी खिशातला रुमाल काढला, चेहरा आणि डोळे पुसले. त्यानंतर सभेला उपस्थित लोकांनी जोरदार हसून दात दिली.