लोकसभा निवडणुकीचा निकाल आज (४ जून) लागणार आहे. एव्हाना झालेल्या मतमोजणीमधून दिसलेल्या कलांमध्ये इंडिया आघाडीला ३०० तर इंडिया आघाडीला २२५ जागा मिळणार असल्याची शक्यता दिसते आहे. मतमोजणीअंती या कलांमध्ये बदल होण्याची शक्यता असली तरीही इंडिया आघाडी दमदार पुनरागमन केल्याचे चित्र आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर सत्तास्थापनेसाठी इंडिया आघाडीने आतापासूनच हालचाली सुरु केल्या आहेत. सत्तास्थापनेसाठी एनडीए आघाडीतील पक्षांना आपलेसे करण्याचा प्रयत्न आता इंडिया आघाडीने सुरु केला आहे. आंध्र प्रदेशमधील टीडीपी पक्षाचे प्रमुख एन. चंद्राबाबू नायडू आणि लोकसभा निवडणुकीपूर्वी एनडीए आघाडीमध्ये प्रवेश केलेल्या नितीश कुमार यांना आपल्या बाजूने घेण्याचा प्रयत्न इंडिया आघाडीकडून केला जात आहे. त्यासाठी नितीश कुमार यांना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी पंतप्रधान पदाची ऑफर दिली असल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा : Lok Sabha Election Result : मोदींचं ‘नकली संतान’ विधान भोवलं? उद्धव ठाकरेंची भाजपासमोर कडवी लढत
नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडूंना चुचकारण्याचा प्रयत्न
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार लोकसभा निवडणुकीपूर्वी इंडिया आघाडीमध्ये होते. मात्र, त्यांनी अचानकच इंडिया आघाडीची साथ सोडत एनडीएमध्ये प्रवेश केला. याआधीही नितिश कुमार यांनी या प्रकारचे बेभरवश्याचे राजकारण केल्याने बिहारमधील त्यांचे विरोधक त्यांना ‘पलटूराम’ असे संबोधताना दिसतात. एकेकाळी ‘सुशासन बाबू’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या नितीश कुमार यांची विश्वासार्हता कमी झाल्याने या निवडणुकीत त्यांना फटका बसणार असल्याचे चित्र होते. अशा पार्श्वभूमीवर आता इंडिया आघाडीला सत्तास्थापनेसाठी काही जागांची गरज असताना नितीश कुमार यांना पुन्हा आपल्या बाजूने घेण्यासाठी पंतप्रधान पदाची ऑफर दिली जात असल्याची माहिती एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिली आहे. महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नितीश कुमार यांना फोन करुन हा प्रस्ताव दिला आहे, अशी माहिती आहे. दुसरीकडे, सत्तास्थापनेसाठी मदत केल्यास आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देऊ, असे आश्वासन टीडीपी पक्षाचे प्रमुख एन. चंद्राबाबू नायडू यांना दिले असल्याची माहिती आहे.
हेही वाचा : काँग्रेसच्या सत्तेच्या आशा पल्लवित; शिंदे, नायडूंसह ‘एनडीए’तल्या घटकपक्षांशी संपर्क सुरू
भाजपाचा ‘चारशेपार’चा नारा फोल
भाजपाने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ४०० पारचा नारा दिला होता. याआधी भाजपाने २०१४ आणि २०१९ या निवडणुकीत भाजपाने बहुमत मिळवले होते. यावेळी भाजपाने स्वतः ३७० जागा जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला होता. २०१४ मध्ये भाजपाने ४२८ जागांवर निवडणूक लढवली होती. त्यापैकी २८२ जागा भाजपाने जिंकल्या होत्या. तर २०१९ ला भाजपाने ४३६ जागांवर निवडणूक लढवली आणि ३०३ जागा मिळवल्या होत्या. सध्या दिसत असलेल्या मतमोजणीच्या कलांमध्ये एकट्या भाजपाला २४० तर एनडीएला ३०० च्या आसपास जागा मिळतील, असे चित्र उभे राहिले आहे.