Sharad Pawar Indapur Speech: आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून जागावाटप, संभाव्य उमेदवार, इच्छुकांची समजूत अशा गोष्टींवर भर दिला जात आहे. एकीकडे या घडामोडी घडत असताना दुसरीकडे पक्षांतरालाही वेग आला आहे. त्यातलंच एक मोठं नाव म्हणजे हर्षवर्धन पाटील. भाजपामधून हर्षवर्धन पाटील यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटामध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात बोलताना शरद पवारांनी आपल्या भाषणात जाहीरपणे व्यासपीठावरूनच त्यांच्या पहिल्या उमेदवाराचं नाव जाहीर केलं आहे.
काय म्हणाले शरद पवार?
अद्याप महाविकास आघाडीचं जागावाटप किंवा संभाव्य उमेदवारांची यादी समोर आलेली नसताना शरद पवारांनी थेट उमेदवाराचं नावच जाहीर केल्यामुळे ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडे आल्याचं आता निश्चित झालं आहे. इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशावेळी उपस्थितांना जाहीर आवाहन करताना शरद पवारांनी “यांना तु्म्ही विधानसभेत पाठवा”, असं सांगत अप्रत्यक्षपणे हर्षवर्धन पाटील हे इंदापूरमधून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे, अर्थात महाविकास आघाडीचे उमेदवार असतील, हेच स्पष्ट केलं. त्यामुळे आता यासंदर्भात राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
“काहीही काम असतं तर हर्षवर्धन पाटलांची काय गरज?”
“तुम्हा सगळ्यांच्या मनात काही गोष्टींबाबत स्पष्टता आहे की नाही हे मला काही कळलेलं नाही. काहीही काम द्यावं, असं हर्षवर्धन पाटील म्हणाले. काहीही काम करायचं असतं, तर त्यासाठी तुमची काय गरज आहे? कठीण काम असेल, लोकांच्या हिताचं असेल, लोकांचं जीवन बदलायचं असेल तर अशी कामं हर्षवर्धनकडे द्यायची. ती द्यायची असेल, तर पहिलं काम तुम्हाला करावं लागेल. तुम्ही त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवा”, असं शरद पवार उपस्थित लोकांना उद्देशून म्हणाले.
“मला स्वत:ला उभं राहायचं नाही. १४ वेळा तुम्ही मला निवडून दिलं. त्यातल्या ७ वेळा इंदापूर तालुक्यानं मतं दिली. त्यामुळे मला स्वत:साठी काहीही नकोय. मला महाराष्ट्र बदलायचा आहे. इथल्या लोकांचं जीवन बदलायचं आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आहे. हे जर करायचं असेल, तर ज्यांच्याकडे कर्तृत्व, अनुभव, प्रशासन आहे अशाही लोकांची गरज आहे. ती पूर्तता करायची असेल तर अशा लोकांना विधानसभेत पाठवणं हे तुमचं काम आहे आणि राज्याचं काम करण्याची जबाबदारी सोपवणं माझं काम आहे”, असंही शरद पवार यावेळी म्हणाले.
“काही लोक मला विचारत होते कसं होणार? मी म्हटलं काहीही काळजी करू नका. जावई कुणाचा आहे? आम्ही कुठेही मुली देत नसतो. आम्ही चांगलं घर बघूनच मुलींना देत असतो”, असं शरद पवारांनी म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. “आम्हाला घर चांगलं मिळालं आहे. त्यांचा संसार जसा नीट चालला, तसा महाराष्ट्राचा संसारही नीट करण्याची ताकद हर्षवर्धन पाटील यांच्यात आहे”, अशा शब्दांत शरद पवारांनी हर्षवर्धन पाटील यांचं कौतुक केलं.
फलटणला मोठा पक्षप्रवेश?
दरम्यान, यावेळी शरद पवारांनी येत्या १४ ऑक्टोबर रोजी फलटणमध्ये मोठा पक्षप्रवेश होण्याचे सूतोवाच दिले. “मी जास्त काही बोलत नाही. चित्र बदलतंय. आज हा कार्यक्रम झाला. निघायच्या वेळी आणखी कुठूनतरी फोन आला. त्यांनी हट्ट केली की इंदापूरला तुम्ही आले, १४ तारखेला आमच्याकडे आलंच पाहिजे. मी विचारलं काय कार्यक्रम आहे? तर ते म्हणाले इंदापूरला जो कार्यक्रम आहे तोच कार्यक्रम आहे. मी विचारलं कुठे? तर ते म्हणाले फलटणला. समजलं का? त्यामुळे आता यानंतर फलटण. त्यानंतर पुढचा महिनाभर जवळपास सगळे दिवस बुक झाले आहेत. लोकांच्या मनात हा विचार आहे की एकत्र आलं पाहिजे. परिवर्तन झालं पाहिजे”, असं ते म्हणाले.