Karnataka Vidhan Sabha Election Results 2023: कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल आता स्पष्ट झाले असून काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळालं आहे. दुसरीकडे भाजपाला दारूण पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर देशभरातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. विरोधकांनी भाजपाच्या या पराभवावर तोंडसुख घ्यायला सुरुवात केली आहे. भाजपाकडून मात्र अँटि इन्कम्बन्सीचं कारण सांगितलं जात आहे. तसेच, राज्यात सक्षम विरोधी पक्षाची भूमिका घेणार असल्याचंही भाजपानं स्पष्ट केलं आहे. या सगळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसला कर्नाटकात भोपळा फोडता आलेला नाही. त्यासंदर्भात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर भूमिका मांडली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार कुठे आणि किती?
राष्ट्रवादी काँग्रेसने कर्नाटकमध्ये एकूण ९ उमेदवार निवडणुकीत उभे केले होते.
१. निपाणी (बेळगाव) – उत्तमराव पाटील
२. जेवर हिप्पारगी (विजापूर) – मन्सूर साहेब बिलाही
३. बसवन बागेवाडी (विजापूर) – जमीर अहमद इनामदार
४. नागथन (विजापूर) – कुलप्पा चव्हाण
५. येलबर्गा (कोप्पल) – हरी आर
६. रानबेन्नूर (हवेरी) – आर. शंकर
७. हाग्री बोम्मनहल्ली (विजयनगर) – सुगुना के
८. विराजपेट (कोडोगो) – एस. वाय. एम. मसूद फौजदार
९. नरसिंहराज (मैसूर) – रेहाना बानो
मात्र, निपाणीतील उत्तमराव पाटील वगळता इतर कोणत्याही उमेदवाराला आपली छाप पाडता आलेली नाही. उत्तमराव पाटील यांना काही प्रमाणात मतं मिळाली आहेत. यासंदर्भात शरद पवारांनी आपली भूमिका मांडली आहे.
“राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कर्नाटकात शक्तिशाली पक्ष आहे अशी स्थिती नाही. पण आम्ही उमेदवार उभे करून एक प्रयत्न केला. त्यात निपाणीतील उत्तमराव पाटील या एका उमेदवाराला आम्ही शक्ती दिली होती. तिथे निर्णय येईल अशी अपेक्षा होती. पहिल्या पाच फेऱ्यांमध्ये ते पहिल्या क्रमांकावर होते. पण नंतर ते दुसऱ्या क्रमांकावर गेले. अंतर जास्त असल्यामुळे तिथे यश मिळेल अशी खात्री दिसत नाही. पण एखाद्या राज्यात प्रवेश करण्यासाठी हा निर्णय आम्ही घेतला होता”, असं शरद पवार यावेळी म्हणाले.
“मला एका गोष्टीचा आनंद आहे…”
“मला एका गोष्टीचा मात्र आनंद आहे. आमचं खरं लक्ष्य होतं की कर्नाटकात भाजपाचा पराभव व्हावा. त्यांचं सरकार जरी असलं, देशाच्या वरीष्ठ नेत्यांनी अनेक सभा जरी घेतल्या असल्या, प्रचार केला असला, तरी तिथल्या जनतेचा रोष या मतांमधून व्यक्त होईल अशी खात्री आम्हाला होती”, असं शरद पवार यांनी नमूद केलं.
पंतप्रधान मोदींना काय संदेश द्याल? काँग्रेस नेते सिद्धरमय्या म्हणाले, “मोदींना वाटत होतं की…”
“आम्ही चमत्कार करण्यासाठी या जागा लढवल्या नव्हत्या. प्रवेश करण्यासाठी या जागा लढवल्या होत्या. निपाणीच्या एका जागेवर आम्ही खऱ्या अर्थाने लक्ष केंद्रीत केलं होतं”, असंही शरद पवारांनी स्पष्ट केलं.