कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल आता स्पष्ट झाला असून त्यात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाल्याचं आता स्पष्ट होऊ लागलं आहे. भाजपाच्या डावपेचांना हा मोठा धक्का मानला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रातील आणि विविध राज्यांमधलेही भाजपाचे अनेक दिग्गज नेते कर्नाटकात प्रचाराला आले होते. मात्र, यानंतरही भाजपाचा पराभव झाल्यामुळे विरोधी पक्षांचा उत्साह वाढल्याचं पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटक निवडणूक निकालांचे पडसाद महाराष्ट्रात उमटू लागले असून शरद पवारांनी त्यासंदर्भातले संकेत दिले आहेत.
शरद पवारांना फोडाफोडीच्या राजकारणाचा संशय
दरम्यान, शरद पवारांनी कर्नाटकमध्येही फोडाफोडीच्या राजकारणाची शक्यता व्यक्त केली आहे. “फोडाफोडीच्या राजकारणाची शक्यता नाकारता येत नाही. पण कर्नाटकच्या जनतेनंच असा निकाल दिलाय. फोडाफोडीला संधी मिळणार नाही याची खबरदारी जनतेनंच घेतली आहे”, असं शरद पवार म्हणाले आहेत. कर्नाटक निवडणूक निकालांनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
“मोदी है तो मुमकिन है लोकांना अमान्य”
‘मोदी है तो मुमकिन है’ याला लोकांनी नाकारल्याचं शरद पवार म्हणाले. “मोदी है तो मुमकिन है असं याआधीच बोलायला भाजपाच्या लोकांनी सुरुवात केली होती. हळूहळू एका व्यक्तीच्या हातात सगळी सूत्रं या गोष्टीला लोकांचा पाठिंबा नाही हे आता दिसायला लागलंय”, असं शरद पवार म्हणाले.
“कर्नाटकच्या जनतेनं भाजपाला धडा शिकवला, आता…”, निकालावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया!
लवकरच मविआची बैठक होणार!
दरम्यान, यावेळी बोलताना शरद पवार यांनी कर्नाटक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक होणार असल्याची माहिती दिली. “महाराष्ट्रात आम्ही आमच्या पक्षाची बैठक दोन दिवसांनी बोलवली आहे. मी स्वत: उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधला आहे. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र बसून पुढची आखणी आत्तापासूनच करावी हा माझा विचार आहे. त्यानुसार मी इतर दोघांशी बोलणार आहे. त्यानुसार या मार्गाने जायचा निर्णय आम्ही घेणार आहोत”, असं शरद पवारांनी यावेळी सांगितलं.
“तिन्ही पक्ष एकत्र लढले, तर बदल शक्य आहे”
“मी महाराष्ट्रात हल्लीच काही ठिकाणी गेलो. सोलापूर, सांगोला, कागल, साताऱ्याला गेलो. या सगळ्या भागात मागच्या निवडणुकीच्या वेळी मी जसा प्रचाराला बाहेर पडलो आणि माझी ती पावसातली सभा वगैरेला जो प्रचंड प्रतिसाद होता, तेच चित्र गेल्या आठवड्यात मी ज्या सहा ठिकाणी गेलो, तिथे दिसलं. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की लोकांना इथेही बदल हवाय. ते पुढच्या निवडणुकीत दिसेल. आम्ही तिघं एकत्रपणे निवडणुकीला सामोरे गेल्यानंतर ते घडताना दिसतंय. आम्हाला ठाऊक आहे की कोणतं धोरण योग्य राहील. आम्हाला असं वाटतं की तिघांनी एकत्र यावं. त्याबरोबरच छोट्या पक्षांनाही विश्वासात घ्यावं. पण बाकीच्या सहकाऱ्यांशी बोलूनच त्याचा निर्णय घेतला जाईल”, असं शरद पवार यावेळी म्हणाले.
एकीकरण समितीचा पराभव का झाला?
शरद पवारांनी सीमाभागात महाराष्ट्र एकीकरण समितीचा पराभव का झाला? याचं कारण पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं. “समितीला अपयश आलं ही गोष्ट मान्य करायलाच हवी. आम्ही समितीच्या विरोधात कुठेही उमेदवार उभा केला नाही. आम्ही कुठेही प्रचाराला गेलो नाही. कारण समितीला महाराष्ट्रानं विश्वास दिला होता. पण यावेळी एकीकरण समिती आणि अन्य पक्षांमध्ये एकवाक्यता राहिली नाही. याचा परिणाम म्हणून त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं”, असं शरद पवार यावेळी म्हणाले.