राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभेत उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांचा यावेळी त्यांनी समाचार घेतला. २०१४ साली मोदी यांनी पेट्रोलचे दर कमी करू असे म्हटले होते. त्यावेळी पेट्रोलचे दर ७१ रुपये प्रती लीटर होते. मात्र आज पेट्रोलच्या दराने शंभरी ओलांडली आहे. मग त्यांच्या आश्वासनांचे काय झाले? असे सांगून शरद पवार यांनी २०१४ साली पंतप्रधान मोदींनी केलेले भाषण आपल्या मोबाइलमधून शरद पवार यांनी जाहीररित्या ऐकवले.
“मोदींच्या विरोधात लोकांमध्ये रोष असल्यानेच आता भाजपा हिंदू-मुस्लिम..”, शरद पवारांचा हल्लाबोल
काय म्हणाले शरद पवार?
शरद पवार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक सभेत आम्हाला शिव्या घालत आहेत. पण आम्हाला शिव्या देऊन जनतेचे प्रश्न सुटणार आहेत का? तुम्ही दहा वर्षात काय केले? हे लोकांना सांगा. त्यानंतर शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे २०१४ सालच्या निवडणुकीत केलेले भाषण मोबाइलवर लावून ते लोकांना ऐकवले. त्या भाषणात मोदी म्हणतात, “महागाई इतकी आहे, गरिब काय खाणार? पंतप्रधान (डॉ. मनमोहन सिंग) महागाईचा ‘म’ देखील बोलायला तयार नाहीत. मेलात तर मेलात, तुमचं नशीब. गरिबाच्या घरी चूल पेटत नाही. मुलं रात्रभर रडतात, आई अश्रू पिऊन झोपते. देशातल्या नेत्यांना गरीबांची पर्वा नाही. ही देशाची परिस्थिती आहे. मतदान करायला जाताना घरातल्या गॅस सिलिंडरला नमस्कार करून जा.”
हे भाषण लोकांना ऐकवल्यानंतर शरद पवार म्हणाले, २०१४ साली मोदींनी हे भाषण केलं होतं. त्यानंतर दहा वर्ष त्यांना सत्ता मिळाली. तरी अजूनही आम्हालाच शिव्या का घालत आहात? तुम्ही १० वर्षात काय केलं? याचा अर्थ एकच आहे, मोदी दिलेला शब्द पाळत नाहीत. आताही ते नवी नवी आश्वासने देत आहेत, अशी टीका शरद पवार यांनी केली.
“पेट्रोलचे दर ५० दिवसात कमी करणार असं मोदी म्हणाले होते, आता तीन हजार दिवस..”, शरद पवारांचा सवाल
मी असा पंतप्रधान पहिल्यांदाच पाहिला
शरद पवार पुढे म्हणाले, “मोदींची सर्व भाषणे काढून बघा. ते कधी नेहरूंवर टीका करतात, कधी इंदिरा गांधीवर टीका करतात. आज यापैकी कुणीही हयात नाहीत. नेहरु आणि इंदिरा गांधी यांनी या देशासाठी दिलेले योगदान विसरता येणार नाही. आजवर मी अनेक पंतप्रधान पाहिले. राजीव गांधी पंतप्रधान असताना मी लोकसभेत होतो. त्यानंतरही अनेक पंतप्रधान झाले. या सर्वांनी देशाचा विचार केला. पण हा पहिलाच पंतप्रधान आहे, जो देशाचा विचार न करता, समाजात वाद निर्माण कसे होतील? याचा प्रयत्न करताना दिसतो. हा देश एका धर्माचा नसून सर्व धर्माचा आहे.”