Sharad Pawar Speech in Rain: गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी शरद पवारांनी साताऱ्यात भर पावसात घेतलेल्या सभेची जोरदार चर्चा पाहायला मिळाली होती. त्यानंतर लागलेल्या निकालांमध्ये उदयनराजेंचा पराभव झाल्याचं पाहायला मिळालं. यानंतर आता पुन्हा एकदा शरद पवारांच्या पावसातल्या सभेची चर्चा होऊ लागली आहे. शुक्रवारचा दिवस दोन पावसातल्या सभांनी गाजवला. एकीकडे देवेंद्र फडणवीसांनी पावसात सभा घेतली असताना दुसरीकडे शरद पवारांनी इचलकरंजीमध्ये सभा घेताना अचानक पाऊस आल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. यावेळी पावसातल्या सभेबाबत शरद पवारांनी मिश्किल टिप्पणी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले शरद पवार?

शरद पवारांनी यावेळी इचलकरंजीचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे उमेदवार मदनराव कारंडे व शिरोळमधील उमेदवार गणपतरावजी पाटील यांच्यासाठी एकत्रित सभा घेतली. यावेळी बोलताना शरद पवारांनी सध्याची निवडणूक ही महाराष्ट्राचं भवितव्य ठरवणारी असेल, अशी प्रतिक्रिया दिली.

“मला आनंद आहे की, आज इचलकरंजी मतदारसंघातून मदनराव कारंडे, हातकणंगलेमधून राजू आवळे, शिरोळमधून गणपतरावजी पाटील यांची आज एकत्रित प्रचारसभा पार पडली. ही निवडणूक महाराष्ट्राचे भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. त्याच्यामध्ये माझा आणि जाहीर सभेचा आणि पावसाचा काहीतरी संबंध आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक वेळेला मी बोलायला उभा राहिलो की, पावसाची सुरुवात होते. हे याआधीही अनेकदा झालं आहे की मी बोलायला सुरुवात केली की पावसाला सुरुवात होते आणि अशा वेळी निवडणुकीचे निकाल चांगले लागतात. यावेळीही तुम्हा सर्वांना हे ठरवावं लागेल की महाराष्ट्राचं सरकार कुणाच्या हाती सोपवायचं आहे”, असं शरद पवार म्हणाले.

“राज्याचा कारभार कुणाला सोपवायचा याचा निर्णय घ्या”

“मध्यंतरी देशाच्या लोकसभेची निवडणूक झाली, आता विधानसभेची निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचा कारभार कोणाच्या हातामध्ये द्यायचा? याचा निकाल आपल्या सगळ्यांना घ्यायचा आहे. ज्यांच्या हातामध्ये आपण महाराष्ट्राची सत्ता दिली त्यांचा पाच वर्षांचा अनुभव बघितला तर आज इथे सत्तेमध्ये बदल केल्याशिवाय पर्याय आपल्या सगळ्यांसमोर नाही”, असंही आवाहन शरद पवारांनी यावेळी उपस्थितांना केलं.

Sharad Pawar : अजित पवारांचा शिंदेंना दम? शरद पवारांकडून भर सभेत मिमिक्री; म्हणाले, “शिंदेंनी मला विनंती केली, समजून घ्या…”

याशिवाय पुन्हा एकदा पावसाचा उल्लेख करत शरद पवारांनी उपस्थितांचे आभारदेखील मानले. “भर पावसात तुम्ही इथे आलात, आमची भूमिका समजून घेण्याची तयारी दाखवली. त्यासाठी तुमचे धन्यवाद देतो”, असं ते भाषणाच्या शेवटी म्हणाले. शरद पवारांनी या सभेतील भाषणाचा उतारा त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर शेअर केला आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar rain speech rally in icharkaranji for maharashtra vidhan sabha election 2024 pmw