एक्झिट पोल्समध्ये एनडीएला ३५० पेक्षा जास्त जागांचा अंदाज वर्तवल्यानंतर आजच्या निकालासंदर्भात अनेकांनी आकडे गृहीत धरले होते. मात्र दुपारपर्यंत आलेल्या कलांमध्ये एनडीएला बहुमत मिळत असलं तरी एक्झिट पोल्सइतक्या जागा मिळत नसल्याचं स्पष्ट झालं. यासंदर्भात आता राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटू लागल्या असून इंडिया आघाडीतील नेत्यांनी एनडीएच्या घटकपक्षांशी संपर्क करायला सुरुवात केल्याचं बोललं जात आहे. खुद्द शरद पवारांनी नितीश कुमार व जितनराम मांझी यांच्याशी चर्चा केल्याचा दावा करण्यात आला असताना त्यांनीच यासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून महाराष्ट्रात १० मतदारसंघांत उमेदवार उभे करण्यात आले होते. त्यातील सात ठिकाणी पक्षाचे उमेदवार मोठ्या आघाडीसह विजयाच्या दिशेनं जात असल्याचं शरद पवारांनी सांगितलं. तसेच, बारामतीमधील सुप्रिया सुळेंच्या मताधिक्याचाही विश्वास होता, असंही ते म्हणाले. यावेळी एनडीएमधील घटकपक्षांना संपर्क केल्याबाबत विचारणा केली असता शरद पवारांनी हे वृत्त फेटाळून लावलं आहे. निकालांच्या कलाबाबत भूमिका मांडण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
“परिवर्तनासाठी चित्र अनुकूल”
“महाराष्ट्राच्या जनतेचे आभार. महाराष्ट्रात एक प्रकारची परिवर्तनाची प्रक्रिया सुरू झाली. महाराष्ट्रात निवडणुकीचा जो निकाल समोर आलाय, तो इतर ठिकाणच्या परिवर्तनाला पोषक असा निकाल आहे. सुदैवाने देशपातळीवरचं चित्रही आशादायी आहे. विशेषत: उत्तर प्रदेशमध्ये जे निकालाचे दावे केले जात होते, त्यापेक्षा वेगळा निकाल लागला आहे. या निकालाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यापूर्वी भाजपाला उत्तर प्रदेश आणि इतर भागात जे यश मिळायचं, त्याचं मताधिक्य जास्त असायचं. पण आज त्यांना ज्या काही जागा मिळाल्यात, त्या मर्यादित अशा मताधिक्याने मिळाल्या आहेत. याचा अर्थ देश पातळीवर आम्ही व आमच्या सहकाऱ्यांनी अधिक लक्ष दिलं, तर आज उत्तरेकडचा चेहरा बदलायला अनुकूल चित्र दिसतंय. त्यासाठी आम्हा लोकांकडून काळजी घेतली जाईल”, असं शरद पवार म्हणाले.
काँग्रेसच्या सत्तेच्या आशा पल्लवित; शिंदे, नायडूंसह ‘एनडीए’तल्या घटकपक्षांशी संपर्क सुरू
शरद पवारांनी कुणाशी चर्चा केली?
दरम्यान, शरद पवारांनी यावेळी एनडीएमधील नितीश कुमार यांच्याशी चर्चा केली नसल्याचं सांगितलं. “आज मी काही सहकार्यांशी चर्चा केली. मल्लिकार्जुन खर्गे, सीताराम येचुरी यांच्याशी बोललो. कदाचित उद्या दिल्लीत एक बैठक होण्याची शक्यता आहे. त्याचा संदेश आज संध्याकाळपर्यंत मला व आमच्या इतर सहकाऱ्यांना मिळेल. तसं असेल, तर आम्ही त्या बैठकीला तातडीने जाऊ. त्यानंतर पुढचं धोरण सामुहिकपणे चर्चा करून ठरवू”, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं.
“मी चंद्राबाबू किंवा आणखी कुणाशी बोललेलो नाही. माझं बोलणं खर्गे आणि येचुरींशीच झालं. इतरांशी चर्चा करण्याचं धोरण राष्ट्रीय पातळीवरील आमच्या सहकाऱ्यांशी बोलून ठरवलं जाईल”, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं. नितीश कुमारांची मदत होईल का? अशी विचारणा केली असता, “माझं त्यांच्याशी काही बोलणं झालेलं नाही. आमचे संबंध आहेत, पण आत्ता बोलणं झालेलं नाही”, असं ते म्हणाले.
१० पैकी ७ जागांवर राष्ट्रवादी आघाडीवर
“आजच्या निवडणुकीत अनेक गोष्टी चांगल्या घडल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली मर्यादित जागा लढवल्या. आम्ही १० जागा लढवल्या. पण त्यापैकी ७ जागांवर आम्ही आघाडीवर आहोत असं सध्या चित्र दिसतंय. याचा अर्थ आमच्या पक्षाचा स्ट्राईक रेट चांगला राहिला आहे”, असं ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका
दरम्यान, शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्षावर धार्मिक राजकारण केल्याबाबत टीका केली. “मंदिर-मशिदीवर बोलायची गरज नव्हती. ज्यांना सामान्य जनतेबाबत विश्वास नाही, त्यांनी त्या गोष्टींवर भाष्य केलं. पण जनतेनं त्याचा स्वीकार केला नाही”, असं शरद पवार म्हणाले.
अजित पवारांच्या मतदारसंघातून सुप्रिया सुळेंना मोठं लीड!
यावेळी शरद पवारांनी पत्रकार परिषदेत बोलताना बारामती मतदारसंघाबाबतही भाष्य केलं. “१६व्या फेरीपर्यंत सुप्रिया सुळेंना बारामतीमधून ७६ हजारांचं लीड होतं. एकट्या बारामती विधानसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळेंना ३५ हजारांचं लीड होतं”, असं शरद पवार म्हणाले. “माझं स्वत:चं बारामतीबाबत असं विश्लेषण आहे की यापेक्षा वेगळा निकाल तिथे लागेल असं मला कधी वाटलेलं नाही. शिवाय बारामतीशी माझे स्वत:चे वैयक्तिक गेल्या ६० वर्षांचे सहसंबंध राहिले आहेत. तिथल्या समान्य माणसाची मानसिकता काय आहे हे मला माहिती आहे. तो योग्य निर्णय घेतो, याची खात्री आम्हाला आहे”, असा ठाम दावा शरद पवारांनी यावेळी केला.