Premium

“नकली राष्ट्रवादी, शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होणार”, मोदींच्या दाव्यावर शरद पवार म्हणाले, “मी सुचवलेलं की…”

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार एका मुलाखतीत म्हणाले होते की, आगामी काळात अनेक लहान-मोठे पक्ष किंवा प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात.

sharad pawar narendra modi (1)
शरद पवार पत्रकार परिषदेत बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (१५ मे) दिंडोरी येथे जाहीर प्रचारसभेला संबोधित केलं. भारतीय जनता पार्टीने दिंडोरीमधून विद्यमान खासदार भारती पवार यांना पुन्हा एकदा लोकसभेच्या रिंगणात उतरवलं आहे. भारती पवार यांच्या प्रचारार्थ भाजपाने आयोजित केलेल्या प्रचारसभेला काल पंतप्रधान मोदींनी हजेरी लावली. या प्रचारसभेला संबोधित करताना मोदी म्हणाले, “महाराष्ट्रातील अनेक लहान पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याची योजना इंडिया आघाडीने आखली आहे. विरोधी पक्षांनी नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात विलीन करून मजबूत विरोधी पक्ष बनवण्याचा मनसुबा बनवला आहे.”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार एका मुलाखतीत म्हणाले होते की, “आगामी काळात अनेक लहान-मोठे पक्ष किंवा प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात. लोकसभा निवडणुकीनंतर असं चित्र आपल्याला पाहायला मिळू शकतं.” शरद पवारांच्या या वक्तव्यावरून भाजपा आणि शिवसेनेचा शिंदे गट महाविकास आघाडीवर टीका करू लागला आहे. “आगामी काळात शिवसेनेच्या ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतो”, असा दावा भाजपाने केला आहे. शरद पवारांच्या वक्तव्यावरून दिंडोरीच्या सभेत मोदी म्हणाले, “शरद पवारांचा पक्ष आणि उद्धव ठाकरे यांचा पक्ष (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) काँग्रेसमध्ये विलीन होईल. मोदींच्या या वक्तव्यावर आता शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.”

शरद पवार यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, “मीच असं सुचवलेलं की, काँग्रेसची विचारधारा जोपासणारे, काँग्रेसच्या विचारधारेवर चालणारे अनेक पक्ष आहेत… मी केवळ विचारधारेबद्दल बोलतोय… काँग्रेसच्या विचारधारेचे अनेक पक्ष विखुरले आहेत… त्या पक्षांबाबत मी एक सल्ला दिला होता की सारख्या विचारधारा असणाऱ्या पक्षांनी एकत्र येण्याचा विचार करायला हवा. तसं करणं खूप उपयुक्त ठरेल. हा माझा विचार होता. मात्र यामुळे मोदींना कसला त्रास झाला ते मला समजलं नाही.”

हे ही वाचा >> बारामतीच्या मतदानानंतर अजित पवार प्रचाराला अनुपस्थित; शरद पवार काळजी व्यक्त करत म्हणाले, “ते…”

राज ठाकरेंना टोला

दरम्यान कल्याणमधील सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले होते की “शरद पवारांनी याआधी अनेक राजकीय पक्ष फोडण्याचं काम केलं आहे. त्यामुळे आता त्यांचा पक्षदेखील फुटला आहे.” राज ठाकरे यांच्या या टीकेला शरद पवारांनी उत्तर दिलं आहे. पत्रकार परिषदेत शरद पवारांना राज ठाकरेंनी केलेल्या टीकेबद्दल विचारण्यात आलं. त्यावर शरद पवार म्हणाले, “राज ठाकरे नक्की काय म्हणाले ते काही मला माहिती नाही. त्याचबरोबर राज ठाकरे यांचं महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं स्थान काय आहे हे देखील मला माहिती नाही.”

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sharad pawar reply on narendra modi claim uddhav thackeray shivsena and ncp will merge in congress asc

First published on: 16-05-2024 at 12:13 IST
Show comments