राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची अमरावतीतल्या वरूड येथे जाहीर प्रचारसभा पार पडली. या सभेत पवार यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत मतदारांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन केलं. तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली. तसेच शरद पवार म्हणाले, कदाचित यंदाची लोकसभा निवडणूक ही शेवटची निवडणूक ठरू शकते. त्यामुळे मतदारांनी विचार करून मतदान करावं.
शरद पवार म्हणाले, आम्ही या निवडणुकीला खूप महत्व देत आहोत. कारण आम्हाला चिंता आहे की, ही आपल्या देशातील शेवटची निवडणूक ठरू नये. मी गेल्या अनेक दशकांमध्ये देशाचे अनेक पंतप्रधान पाहिले. माझ्या राजकीय जीवनात अनेक पंतप्रधानांबरोबर काम केलं. अनेकांबरोबर सरकारमध्ये काम करण्याची मला संधी मिळाली. परंतु, मी असा पंतप्रधान पहिल्यांदाच पाहिला ज्याने निवडणुकीपूर्वी दिलेलं एकही आश्वासन पूर्ण केलेलं नाही. मोदींनी गेल्या १० वर्षांमध्ये एकाही आश्वासनाची पूर्तता केलेली नाही.
देशभर महागाई वाढली आहे, जीवनावश्यक वस्तूंच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. त्यामुळे लोकांना संसाराचा गाडा हाकणं कठीण झालं आहे. गेल्या १० वर्षांपासून देशात तुमचं सरकार आहे आणि तुम्ही (नरेंद्र मोदी, भाजपा) आम्हाला आमच्या कामांचा हिशेब विचारता. देशात महिला-भगिनींवर अत्याचार होत आहेत. त्यावर तुम्ही काही बोलला नाहीत, काही केलं नाही. आमच्या काळात एकही अत्याचाराची घटना घडली नव्हती. आम्ही मणिपूरला शिष्टमंडळ पाठवलं होतं, तेव्हा असं कळलं की, पीडितांच्या घरांवर हल्ले झाले, तिथल्या महिलांवर अत्याचार झाले तरी सरकारने त्यांच्याकडे अजिबात लक्ष दिलं नाही. कोरोना काळात अनेक लोक आपल्या गावी गेले. मात्र सरकारने लोकांना न्याय देण्याचं काम केलं नाही. राज्यात सर्व शेतकरी संकटात आहे, त्यामुळे तिथे आपलं वजन असणं गरजेचं आहे.
हे ही वाचा >> “मैदान सोडून पळून जाणारे आता…”, पंतप्रधान मोदींचा सोनिया गांधींना टोला
शरद पवार म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानावर हल्ला करण्याचं काम मोदी सरकार करत असून नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी काहीही केलेलं नसताना ते मला प्रश्न विचारत आहेत.