सुमारे ८ महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आणि अजित पवार गट ४० आमदारांसह वेगळा झाला. मात्र, अजूनही त्यासंदर्भात अनेक दावे आणि आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण चालूच असल्याचं दिसत आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सातत्याने बारामतीमधील निवडणुकीच्या निमित्ताने हे पाहायला मिळत आहे. शरद पवारांनी नुकतंच एका मुलाखतीमध्ये थेट अजित पवारांना लक्ष्य करत त्यांचा तोल ढळल्याची टीका केली आहे. तसेच, अजित पवारांनी केलेल्या एका टीकेचाही शरद पवारांनी समाचार घेतला आहे.

“त्यांना मिळालेलं स्थान कुणामुळे मिळालं हे…”

‘बोल भिडू’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवारांना अजित पवार गेल्या काही काळात करत असलेल्या टीकेवर प्रतिक्रिया दिली. भूखंडाचं श्रीखंड किंवा दाऊदशी संबंधांचे आरोप असे मुद्दे अजित पवार सभांमधून मांडत असल्याबाबत विचारणा केली असता शरद पवारांनी अजित पवारांचा तोल पूर्णपणे ढळल्याचं विधान केलं. “त्यांना जे काही एक स्थान मिळालं, शून्यातून इथपर्यंत, त्यात कुणाचं योगदान आहे हे महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे मला त्यावर काही बोलायचं नाही”, असं शरद पवार म्हणाले.

“…तेव्हा हे बोलणारे एकदाही आले नाहीत”

“लोक असं म्हणतात की एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर एखादी व्यक्ती या पातळीवर जायला लागली तर त्याच्याबद्दल फारशी चर्चा करू नये आणि त्याला गांभीर्यानेही घेऊ नये. माझ्या बंधूंचं माझ्यावर अतिशय प्रेम होतं. माझ्या निवडणुकीच्या शेवटच्या काळात ते सतत माझ्यामागे उभे राहिले शेवटपर्यंत. त्यांच्या अखेरच्या काळातही ते मुंबईला उपचारांसाठी माझ्याच घरी होते. त्यावेळी आज जे सांगतात ते एकदाही आले नव्हते. असं असताना असं काहीतरी बोलणं हे योग्य नाही”, अशा शब्दांत शरद पवारांनी अजित पवारांवर टीका केली.

‘भटकती आत्मा’च्या उल्लेखानंतर अजितदादांच्या फलकांवरून मोदींची छबी गायब

“कुटुंबात तर असं बोलणं अतिशय अयोग्य आहे. पण ज्याचा तोल ढळतो, तो काहीही बोलतो. मग त्यांना दाऊदचीही आठवण होते आणि भूखंडाच्या श्रीखंडाचीही आठवण होते. याचा अर्थ त्यांचा तोल हा पूर्णपणे ढळलेला आहे”, असं शरद पवार म्हणाले.

विकासनिधी कुणाला मिळतो?

“तुम्ही कचाकच बटणं दाबा, मी विकासनिधी देतो”, अशा आशयाचं विधान अजित पवार यांनी केल्यानंतर त्यावरून बराच वाद निर्माण झाला. त्यावरही शरद पवारांनी टीका केली. “एक समज असा आहे की मला निवडून दिलं किंवा माझ्या विचारांचा माणूस निवडून दिला तर मी जास्त निधी आणेन. केंद्र सरकारचा निधी असा खासदारांना देत नसतात. तो त्याच्या मतदारसंघाच्या विकासासाठी दिला जातो. तेवढी एकच सुविधा खासदारांसाठी असते. संसदेच्या सभागृहात लोकांचे प्रश्न मांडणे, प्रश्न सोडवून घेणे आणि त्यासाठी आपलं प्रतिनिधित्व प्रभावी करणे याची काळजी प्रतिनिधींनी घ्यायची असते”, अशा शब्दांत शरद पवारांनी अजित पवारांना समज दिली.

“जे अर्थमंत्री असतात, त्यांनी…”

“आज त्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं जात आहे. सांगितलं जातं की मी निधी आणेन, अमुक कुणाला मत दिलं तर निधी देईन. असा निधी येत नसतो, जात नसतो. जे मंत्री आहेत, त्यातही अर्थमंत्री आहेत त्यांना संपूर्ण राज्याचा विचार करायला पाहिजे. ते अशी भूमिका घेत असतील, तर याचा अर्थ लोकशाही पद्धतीवर एक प्रकारे दडपण आणि दहशत निर्माण करण्याचा हा प्रकार आहे. अशा लोकांना या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेपासून लोक फेकून देतील”, असंही ते म्हणाले.

Story img Loader