Sharad Pawar on CM Face : “आमच्यासाठी तो विषय संपला”, मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत शरद पवारांचं विधान चर्चेत!

२८८ पैकी २०० जागांची शेअरिंग झाली आहे. उर्वरित जागांसाठी आज बैठक आहे. या बैठकीला तिन्ही पक्षांचे अध्यक्ष आहेत, ते निर्णय घेतील आणि आम्हाला सायंकाळपर्यंत कळवतील, असंही शरद पवार म्हणाले.

Sharad PAwar
शरद पवार नेमकं काय म्हणाले? (फोटो – संग्रहित छायाचित्र)

Sharad Pawar Stand on CM Face : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपांवर जोरदार चर्चा सुरू असून महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात सातत्याने मॅरेथॉन बैठका सुरू आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांतच कोणाला किती जागा मिळणार, कोण लहान आणि कोण मोठा भाऊ ठरणार हे चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, महाविकास आघाडीबाबत शरद पवार यांनीही मोठी माहिती दिली आहे.

जागा वाटपाच्या चर्चांबाबत शरद पवार म्हणाले, २८८ पैकी २०० जागांची शेअरिंग झाली आहे. उर्वरित जागांसाठी आज बैठक आहे. या बैठकीला तिन्ही पक्षांचे अध्यक्ष आहेत, ते निर्णय घेतील आणि आम्हाला सायंकाळपर्यंत कळवतील. “

तसंच, मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा, असं शिवसेनेकडून आवाहन केलं जातंय. याबाबत त्यांना विचारलं असता ते म्हणाले, “आमच्यासाठी विषय संपला आहे. आमच्या तिघांची पत्रकार परिषद झाली तेव्हाच हा विषय ठरला. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे आणि मी स्वतः होतो. ” महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदासाठी अनेक नेते रिंगणात आहेत. याबाबत ते म्हणाले, “यावर चर्चा करण्यात काही अर्थ नाही. निवडणुकीचा निकाल लागू द्या, त्यानंतर या विषयावर बोलता येईल.” तसंच, जयंत पाटलांकडे मोठी जबाबदारी आहे, असं सूचक विधान शरद पवारांनी केलं होतं. त्यावर ते म्हणाले, जागांबाबतचा निर्णय जयंत पाटील घेणार आहेत. त्यांच्याकडे पक्षाची मोठी जबाबदारी आहेच. ते पक्षाचे प्रदेशध्यक्ष आहेत.”

हेही वाचा>> Sharad Pawar : जयंत पाटील महाविकास आघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार? देवेंद्र फडणवीसांच्या आव्हानानंतर शरद पवारांचं सूचक विधान

पिपाणीचा फटका बसणार का?

लोकसभा निवडणुकीच्या वेळी शरद पवार गटाला पिपाणी या चिन्हाचा फटका बसला होता. यंदाही विधानसभेच्या निवडणुकीत पिपाणी हे चिन्ह स्पर्धेत आहे. त्यामुळे यावेळीही याचा फटका बसेल असं वाटतंय का? असं विचारलं असता शरद पवार म्हणाले, “लोकसभेला जे चित्र होतं ते स्पष्ट नव्हतं. आता आम्ही स्पष्ट केलंय.’

“हरियाणात त्यांचं सरकार होतं. ते कायम राहिलं यात काही दुमत नाही. हरियाणाचा झालं तसं जम्मू काश्मीरचं झालं नाही. त्याचा परिणाम येथे होईल असं वाटत नाही. जम्मू काश्मीरकडे आंतरराष्ट्रीय पातळीवर लक्ष असतं. त्यामुळे देशाच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची असते”, असंही शरद पवार म्हणाले.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sharad pawar was talking about cm face should not be revealed before election result sgk

First published on: 17-10-2024 at 09:13 IST
Show comments