“एकनाथ शिंदे गद्दार आहेत”, अशा शब्दात शिवसेनेच्या ठाकरे गटातील राज्यसभेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केलं. उत्तर-पूर्व मुंबई मतदारसंघातून महाविकास आघाडीने माजी खासदार संजय दिना पाटील (शिवसेनेचा ठाकरे गट) यांना लोकसभेच्या रिंगणात उतरलं आहे. त्यांच्या प्रचारासाठी घाटकोपर येथे मविआने आयोजित केलेल्या प्रचारसभेत बोलताना चतुर्वेदी यांनी केलेल्या एका वक्तव्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. चतुर्वेदी यांनी घाटकोपरमधील सभेला संबोधित करताना बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या ‘दिवार’ या हिंदी चित्रपटाचा उल्लेख केला. त्या म्हणाल्या, दिवार चित्रपटात अमिताभ बच्चन एका प्रसंगात त्यांचा हात दाखवतात. त्यांच्या हातावर ‘मेरा बाप चोर हैं’ असं लिहिलेलं असतं. असंच वाक्य खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कपाळावर लिहिलेलं आहे. श्रीकांत शिंदे यांच्या कपाळावर ‘मेरा बाप गद्दार हैं’ असं लिहिलेलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रियांका चतुर्वेदी यांच्या भाषणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच शिवसेनेतील शिंदे गटाचे नेते आता त्यांच्यावर टीका करू लागले आहेत. शिंदे गटाच्या उपनेत्या आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओद्वारे त्यांनी खासदार चतुर्वेदी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना त्यांना टोला लगावला आहे.

शीतल म्हात्रे यांनी म्हटलं आहे की, प्रिय चतुरताई तुम्ही खासदारकी (राज्यसभेचं सदस्यत्व) कशी मिळवली ते लोकांना एकदा सांगितलं पाहिजे. कारण मराठीचा कसलाही गंध नसताना, कुठलंही कर्तृत्व नसताना, शिवसेनेसी काडीमात्र संबंध नसताना, तुम्ही खासदारकी कशी मिळवली हे लोकांना समजलं पाहिजे, आणि आता खासदारकीची टर्म (राज्यसभा सदस्यत्वाचा कालावधी) संपत आल्यावर तुमची तडफड तुमच्या वक्तव्यांमधून दिसत आहे.

हे ही वाचा >> मराठीसाठी आवाज उठवणाऱ्या रेणुका शहाणेंवर चित्रा वाघ यांची टीका; म्हणाल्या, “तुमचं टायमिंग…”

शीतल म्हात्रे म्हणाल्या, ‘बुलंदी’ या हिंदी चित्रपटात एक डायलॉग आहे, ‘बिल्ली के दात गिरे नहीं और चली शेर के मुंह में हात डालने’, हा डायलॉग तुम्हाला लागू पडतो. तुमचा काहीही संबंध नसताना तुम्ही दावोसला गेलात आणि तिथे गुलाबी थंडीत काय काय केलंत हे जरा लोकांना सांगा. त्याच पद्धतीने पुन्हा खासदारकी मिळावी यासाठी तुम्ही काय काय करताय, गेल्या आठवड्यात कोणाकोणाला भेटलात, माझ्याकडे आदित्यचे कसे फोटो आहेत ते दाखवून तरी मला खासदारकी द्या, असा प्रयत्न करणाऱ्या तुम्ही आता कोणाला बोलताय, कोणावर टीका करताय, याचा विचार करा, थोडं भान ठेवा.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sheetal mhatre says priyanka chaturvedi tries to get mp by saying she has photos of aditya thackeray asc