कोल्हापूरमधील हातकणंगले लोकसभा मतदारसंघामधून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी निवडणूक लढवत आहेत. याच मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाकडून खासदार धैर्यशील माने मैदानात आहेत. सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. या अनुषंगाने एका सभेत बोलताना माजी खासदार राजू शेट्टी यांनी मतदारांना केलेल्या एका आवाहनाची चर्चा रंगली आहे. ‘म्हसोबाला वर्षाला परडी सोडता तशी परडी मला पाच वर्षातून एकदा मतदानाच्या माध्यमांतून सोडा’, असे राजू शेट्टी म्हणाले आहेत.

राजू शेट्टी काय म्हणाले?

“पुढची दहा दिवस तुम्ही प्रचार करा, आपल्याला विजयी व्हायचं आहे. कुणालाही अंगावर घेण्याची तयारी आतापर्यंत आपण घेतली आहे. तुमचा आणि आमचा एकच करार आहे. तुम्हाला माहिती आहे का की, तुमच्या प्रत्येकाच्या शेतामध्ये म्हसोबा आहे. आहे की नाही? म्हसोबा काय करतो, तर आपल्या शेताची राखण करतो. मग राखण केल्याबद्दल आपण वर्षांतून एकदा त्याला परडी सोडतो. जर परडी सोडली नाही तर म्हसोबा कोपतो. प्रत्येकजण कृतज्ञता म्हणून परडी सोडत असतो. मी सुद्धा तुमच्या उसाच्या शेतातील म्हसोबा आहे हे लक्षात ठेवा”, असं राजू शेट्टी म्हणाले.

हेही वाचा : “..तर त्यांनी किती कोलांटउड्या घेतल्या हे कळेल”, फडणवीसांच्या ‘त्या’ टीकेला शरद पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले…

“आपोआप २००, ३०० रुपये दर जास्त मिळतो. तुमच्या उसाचं राखण कोण करतंय. मीच करतो ना. मी तुमच्या उसाच्या शेतातील म्हसोबा आहे. तुमच्या उसाचं, तुमच्या दुधाचं, तुमच्या गोठ्यातील जनावरांचं राखण करणारा मी म्हसोबा आहे. मग त्या म्हसोबाला वर्षाला परडी सोडता, मला पाच वर्षातून एकदा तरी परडी सोडा की. पाच वर्षातून एकदा परडी सोडायचं म्हणजे मला मत द्यायचं. बाकी काही नाही. ते मत नंतर तुम्हालाच उपयोगाला येणार आहे. त्या मताचा उपयोग तुम्हाला होणार आहे. त्यामुळे तुमच्या उसाचा प्रश्न, दुधाचा प्रश्न, विद्यार्थ्यांचा प्रश्न, गोरगरीबांचा प्रश्न निवडून आल्यानंतर आपल्याला मार्गी लावता येतील. सामान्य माणसांचा आवाज संसदेपर्यंत पोहोचणार आहे. त्या संसदेला बोलायला लावायचं असेल तर तगडा माणूस तेथे जाणं गरजेचं आहे”, असं राजू शेट्टी म्हणाले.