उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या विद्यमान आमदार वर्षा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे.याच मतदारसंघात माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे राहतात. त्यामुळे त्यांचं मत वर्षा गायकवाड यांना जाणार आहे. याबाबत त्यांनी स्वतः माहिती दिली होती. परंतु, यावरून शिंदे गटाने त्यांच्यावर टीका केली आहे.
उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?
उद्धव ठाकरे म्हणाले, या लोकसभा निवडणुकीत माझं मत वर्षा गायकवाडांना मिळणार आहे. मी त्यांचा मतदार आहे. आम्ही यावेळी काँग्रेसच्या पंजावर मतदान करणार आहोत. त्या पंजामध्ये आमची मशाल आहे. काँग्रेसच्या हातात शिवसेनेची मशाल आहे. आम्ही त्यावर मतदान करणार आहोत आणि त्याचे परिणाम निवडणुकीच्या निकालात तुम्हा सर्वांना दिसतील. त्यानंतर आम्ही तुतारी फुंकणार आहोत.
हेही वाचा>> उद्धव ठाकरेंचं मत मशालीला नाही, मग कुणाला? उमेदवाराचं नाव सांगत म्हणाले, “यावेळी…”
शिंदे गटाची टीका काय?
उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यावर शिंदे गटाने खोचक टीका केली आहे. एक व्यंगचित्र प्रसिद्ध करून शिंदे गटाने म्हटलं आहे की अडीच वर्षे एक वर्षा नीट सांभाळता आले नाही, आणि निघालेत दुसऱ्या वर्षाला पाठिंबा द्यायला.
हेही वाचा >> वर्षा गायकवाड वडिलांसारखा चमत्कार करणार का?
काँग्रेसला तिहेरी लाभ
उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून काँग्रेसने वर्षा गायकवाड यांची उमेदवारी जाहीर केली. वास्तविक गायकवाड यांची दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून लढण्याची इच्छा होती. कारण या मतदारसंघात त्यांचा धारावी मतदारसंघाचा समावेश होतो. उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात वांद्रे पूर्व व पश्चिम, विलेपार्ले, चांदिवली, कुर्ला आणि कलिना या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. मराठी, उत्तर भारतीय, मुस्लीम, दलित, गुजराती अशा संमिश्र वस्तीचा हा मतदारसंघ आहे. मराठी, महिला आणि दलित असा तिहेरी लाभ उठविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.