सांगली पाठोपाठ शिर्डीतही महाविकास आघाडीला फटका बसल्याचं चित्र आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाला दिल्याने नाराज झालेल्या काँग्रेस नेत्या उत्कर्षा रुपवते यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. लोकसभेच्या जागावाटपात महाविकास आघाडीने शिर्डीची जागा ठाकरे गटाला सोडण्यात आली. ठाकरे गटाने भाऊसाहेब वाकचौरेंना शिर्डीतून तिकिट दिलं आहे. त्यामुळे नाराज रुपवतेंनी पक्ष सोडला आहे.
काय म्हटलं आहे उत्कर्षा रुपवतेंनी?
मा. मल्लिकार्जुन खर्गे,
अध्यक्ष, काँग्रेस</p>
माननीय महोदय,
आज १७ एप्रिल २०२४ रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महासचिव पदाचा आणि काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. उपाध्यक्ष -शिर्डी लोकसभा युवक काँग्रेस सचिव भारतीय युवक काँग्रेस, अध्यक्ष मुंबई विभागीय काँग्रेस, संशोधन विभाग, अध्यक्ष, जवाहर बालमंच, महासचिव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अशा विविध पदांवर काम करण्याची संधी मला दिल्याबद्दल पक्षाचे आभार मानते. युवक काँग्रेसपासून सुरु झालेला हा राजकीय प्रवास १६ वर्षांचा होता. जो मी प्रामाणिकपणे आणि कष्टाने केला. महाराष्ट्रासह देशाच्या अनेक रा्ज्यांमध्येही पक्षाची काम केलं.
राज्य महिला आयोगाची सदस्य म्हणून काम करण्याची संधी दिल्यावर अतिशय संवेदनशीलपणे तळागाळातील महिलांपर्यंत पोहचून साथ देण्याचा आणि न्याय देण्याचा प्रयत्न केला. पक्षाने दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडली. रुपवते-चौधरी कुटुंबातील तिसरी पिढी काँग्रेस पक्षात कार्यरत असताना निस्वार्थीपणे अहोरात्र पक्षासाठी झटणाऱ्या माझ्यासारख्या युवा कार्यकर्तीला पक्ष सोडण्याचा निर्णय का घ्यावा लागतो याबद्दल पक्ष नेतृत्वाने विचार करण्याची गरज आहे हे मी नम्रपणे नमूद करते.
उत्कर्षा रुपवते
असं म्हणत उत्कर्षा रुपवतेंनी राजीनामा दिला आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघ पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. परंतु, २००९ नंतर शिर्डीची जागा सातत्याने शिवसेनेकडे राहिली होती. २०१४ मध्ये भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र, या निवडणुकीत सदाशिव लोखंडे यांनी भाऊसाहेब वाकचौरे यांचा पराभव केला होता. परंतु आता वाकचौरे हे पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेकडून रिंगणात उतरले आहेत. अशात उत्कर्षा रुपवते यांनी राजीनामा दिल्याने मविआच्या मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे. याचा भाऊसाहेब वाकचौरे यांना कितपत फटका बसणार, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. उत्कर्षा रुपवते या वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करुन त्यांच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.