Shivsena On NCP Performence In Delhi : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाने दमदार विजय मिळवत, तब्बल अडीच दशकांनंतर दिल्लीची सत्ता मिळवली आहे. या दरम्यान भाजपाने गेल्या बारा वर्षांपासून दिल्ली विधानसभेत सत्तेत असलेल्या आम आदमी पक्षाचा धुव्वा उडवला आहे. या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांनाही पराभवाची चव चाखावी लागली आहे. तर काँग्रेसल सलग दुसऱ्यांदा भोपळाही फोडता आला नाही.

दिल्लीत राष्ट्रवादी लढली होती स्वबळावर

दरम्यान महाराष्ट्रात महायुतीचा (एनडीए) घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही (अजित पवार) दिल्ली विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवली होती. मात्र, यामध्ये त्यांना एकही जागा मिळवता आलेली नाही. यानंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या पराभवाची कारणे शोधून, इथून पुढे देशभरात होणाऱ्या निवडणुकांमध्ये आता झालेल्या चुका सुधारणार असल्याचे म्हटले आहे. अशात शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) मंत्री संजय शिरसाठ यांनी राष्ट्रवादीच्या दिल्ली निवडणुकीतील कामगिरीवर मोठे विधान केले आहे.

राष्ट्रवादीच्या कामगिरीवर शिवसेनेचे मंत्री काय म्हणाले?

मंत्री संजय शिरसाठ यांना दिल्ली विधानसभा निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कामगिरीबाबत विचारण्यात आले, तेव्हा ते म्हणाले, “कार्यकर्त्यांना पुढाकर देण्यासाठी हे जागा लढवणे असते. आता आम्ही शिवसेनेने गोव्यात जागा लढवल्या होत्या, कधी उत्तर प्रदेशात तर कधी दिल्लीतही लढवल्या होत्या. पण, काय मिळाले आम्हाला? किती मते मिळाली? हे कधी यशस्वी झाले नाही. म्हणून राष्ट्रवादी एवढ्या लवकर यशस्वी होईल हे स्वप्न पाहणेही चुकीचे आहे.” दरम्यान टीव्ही ९ मराठीशी बोलताना संजय शिरसाठ यांनी हे विधान केले आहे.

दिल्ली निकालावर अजित पवारांची प्रतिक्रिया

यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या पक्षाच्या दिल्ली विधानसभा निवडणुकीतील कामगिरीवर अजित पवार यांनी पोस्टच्या माध्यमातून भाष्य केले होते. ते म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेसला दिल्ली विधानसभेत अपेक्षित यश मिळाले नसले तरी या निवडणुकीतून आम्हाला खूप शिकायला मिळाले आहे. ही सुरुवात आहे. मिळालेल्या अपयशाचे विश्लेषण करुन भविष्यात देशपातळीवर पक्षबांधणीसाठी अधिक मेहनत घेतली जाईल. दिल्लीसह इतर अन्य राज्यात पक्षाचा विस्तार करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात येईल.”

Story img Loader