महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघाचे जागावाटप आता बऱ्यापैकी स्पष्ट झाले आहे. दोन-चार मतदारसंघ वगळता सर्व मतदारसंघात प्रमुख उमेदवार आता निवडणुकीसाठी सज्ज झाले असून प्रचारात रंगत येत आहे. आधुनिक निवडणुकीत प्रचार गीतांनाही अनन्यसाधारण महत्त्व आहे. शिवसेना शिंदे गटाने आज त्यांचे प्रचार गीत सोशल मीडियावर प्रसिद्ध केले. या गीतामधून बाळासाहेबांचा प्रसिद्ध डायलॉग सुरुवातीलाच वापरण्यात आला आहे. तर गाण्याची शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आवाहन देण्यात आले आहे. शिवसेनेचे प्रचार गीत असले तरी त्यामध्ये बऱ्यापैकी महायुतीचा उल्लेख करण्यात आला आहे.
“आज जो काही मान सन्मान, तुम्हाला मिळतोय, तो शिवसेनेच्या नावावर मिळत आहे. मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही”, बाळासाहेब ठाकरेंच्या या प्रसिद्ध वाक्याने या गाण्याची सुरुवात होते. त्यानंतर उबाठा गटापासून वेगळे झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलेल्या भूमिकेचा पुर्नच्चार केला जातो. बाळासाहेबांच्या जुन्या व्हिडिओसह आनंद दिघे यांच्याही प्रतिमेचा गाण्यात अधूनमधून वापर झालेला दिसतो. “माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही”, हे वाक्य वारंवार दाखवून उबाठा गटावर टीका करण्याचा प्रयत्न होताना दिसतो.
शिवसेना म्हटलं की, आपली ओळख एकच असे सांगताना “कणखर बाणा… हाती भगवा… आणि धनुष्यबाण”, असे कडवे शिवसेनेच्या जुन्या गीताची आठवण कार्यकर्त्यांना करून देते. बाळासाहेब ठाकरे हयात असताना “शिवसेना, शिवसेना”, हे प्रचार गीत प्रसिद्ध करण्यात आले होते. आजही शिवसेनेच्या जाहीर कार्यक्रमात हे गीत लावले जाते. “वाघ एकला राजा, बाकी खेळ माकडांचा…”, हे गाणं प्रत्येक शिवसैनिकाच्या मनात बसलेले आहे. आता शिंदे गटाने प्रसिद्ध केलेलं गाणं नवी ओळख निर्माण करणार का? हे पुढील प्रचारात दिसेल.
पंतप्रधान मोदींचीही गाण्यामध्ये झलक
साडे तीन मिनिटांच्या या गाण्यात नगर विकास मंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी केलेली कामं दिसतात. तसेच मुख्यमंत्री झाल्यानंतर विविध विकास कामांच्या उदघाटनाचे व्हिडिओही दिसतात. व्हिडिओच्या शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही छोटीशी झलक दिसते. “भारताला समृद्ध आणि विकसित बनवायचे आहे”, असे पंतप्रधान मोदी सांगताना दिसतात.