शिवसेना शिंदे गटाने काही दिवसांपूर्वीच लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. शिंदे गटाने एकूण आठ उमेदवारांची नावे जाहीर केली होती. हिंगोलीमधून हेमंत पाटील यांचे नाव जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर हेमंत पाटील यांनी मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू केला होता. मात्र आठवड्याभरातच आता हेमंत पाटील यांचे नाव मागे घेण्याची वेळ शिंदे गटावर आली आहे. त्यांच्याऐवजी आता बाबूराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे २६ एप्रिल रोजी हिंगोली मतदारसंघाचे मतदान पार पडणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची ४ एप्रिल ही शेवटची मुदत आहे. अर्ज भरण्याची मुदत संपण्याच्या एक दिवस आधी ठरलेला उमेदवार मागे घ्यावा लागला आहे.
हिंगोली लोकसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार खासदार हेमंत पाटील यांची उमेदवारी बदलण्यासंदर्भात भाजपाकडून दबावतंत्र सुरू झाल्यानंतर खासदार पाटील यांच्या समर्थनार्थ २०० गाड्या भरून कार्यकर्ते मुंबईला आणले गेले होते. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी हेमंत पाटील डेरेदाखल झाले. हिंगोली मतदारसंघातील भाजपाच्या प्रमुख पदाधिकार्यांनी दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या बैठकीत हेमंत पाटील यांच्याऐवजी धनुष्यबाण या चिन्हावर अन्य कोणालाही उमेदवारी द्यावी, असा सूर निघाला होता. त्यानंतर भाजपाचे शिष्टमंडळ सोमवारी देवेन्द्र फडणवीस यांना परभणी येथे भेटले होते.
हिंगोली लोकसभा मतदार संघात सलग दुसऱ्यांदा विजय मिळविता येत नाही असा राजकीय इतिहास असताना खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी देण्याचा निर्णय शिवसेनेच्या शिंदे गटाने घेतला. मात्र हा निर्णय आता बदलण्याची नामुष्की शिंदे गटवर आली. त्यामुळे सलग दुसऱ्यांदा विजयी होण्याची परंपरा याहीवेळी खंडीत झाली आहे.
बाबूराव कदम कोहळीवर कोण आहेत?
शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाबूराव कोहळीकर यांनी शिवसनेनेच्या फुटीनंतर शिंदे गटात प्रवेश केला होता. हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांना ओळखले जाते. निवघा जिल्हा परिषद निवडणुकीपासून त्यांनी आपली राजकीय जीवनाची सुरुवात केली होती. २००९ साली त्यांनी शिवसेनेकडून हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविली होती. मात्र त्यात त्यांचा पराभव झाला.
हिंगोलीतील मागच्या २३ वर्षांतील खासदार
सन १९८९-९१ : उत्तमराव राठोड (काँग्रेस),
सन १९९१-९६ : विलास गुंडेवार (शिवसेना),
सन १९९६-९८ : ॲड. शिवाजी माने (शिवसेना),
सन १९९८-९९ : सुर्यकांता पाटील (काँग्रेस),
सन १९९९-२००४ : ॲ्ड. शिवाजी माने (शिवसेना),
सन २००४-२००९ : सुर्यकांता पाटील (राष्ट्रवादी),
सन २००९-२०१४ : सुभाष वानखेडे (शिवसेना),
सन २०१४-१९ : ॲड. राजीव सातव (काँग्रेस),
सन २०१९ : हेमंत पाटील (शिवसेना).