शिर्डी लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे निवडणुकीच्या मैदानात आहेत. त्यांच्याविरोधात शिवसेना शिंदे गटाकडून खासदार सदाशिव लोखंडे हे निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीकडून उत्कर्षा रुपवते या निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघात तिहेरी लढत होत होत आहे. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार कोण असणार? याबाबत मोठ्या चर्चा सुरू होत्या. यानंतर अखेर भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी मिळाली.
त्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघात प्रामुख्याने शिवसेना ठाकरे गट विरुद्ध शिवसेना शिंदे गट अशी होत आहे. आज चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडत असून शिवसेना शिंदे गटाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी मतदान केल्यानंतर प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर बोचरी टीका केली. “अंडे न देणाऱ्या खुडूक कोंबडीला कोण स्वीकारणार?”, अशी खोचक टीका लोखंडे यांनी केली. ते टीव्ही ९ शी बोलत होते.
हेही वाचा : “…तेव्हा मोरारजी देसाई म्हणाले होते, तुम्हाला गोळ्या..”, उद्धव ठाकरेंनी सांगितला ‘तो’ प्रसंग!
सदाशिव लोखंडे काय म्हणाले?
“लोकशाहीमध्ये सर्वांना निवडणुका लढवण्याचा अधिकार आहे. जनता कोणाला निवडून संसदेत पाठवायचे ते ठरवत असते. लोकशाहीमध्ये एक मत सर्वांना भारी आहे. मतदारांचा अधिकार आम्हाला मान्य असून आम्ही कोणालाही विरोध करणार नाही. २०१४ आणि २०१९ च्या लोकसभेला मला येथील जनतेने निवडून दिले. आता २०२४ ला आम्ही पुन्हा लढत असून यावेळी शिर्डी लोकसभा मतदारसंघात घाट माथ्याच्या पाण्यासाठी प्रयत्न करणार आहोत”, असं सदाशिव लोखंडे म्हणाले.
भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर टीका
शिर्डी लोकसभा मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारात भाऊसाहेब वाकचौरे यांनी आपल्या भाषणातून अनेकवेळा मुंबईचे पार्सल मुंबईला पाठवा असा हल्लाबोल केला होता. यावर आता सदाशिव लोखंडे यांनी प्रत्युत्तर देत भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. ते म्हणाले, “त्यांचं (भाऊसाहेब वाकचौरे)पार्सल तीनवेळा जनतेने रिजेक्ट केले. त्याची चिंता त्यांनी करावी. पण दुसरीकडे मुंबईचं पार्सल लोकांनी स्वीकारलं. आता मी तिसऱ्या वेळेस मतदान करत आहे”, असा टोलाही सदाशिव लोखंडे यांनी लगावला.
ते पुढे म्हणाले, “मी मतदार आहे. खासदार आहे आणि आता उमेदवारही आहे. दुसरीकडे निवृत्त झालेल्या माणसांचं काय? त्यांची पॉवर काय? आपण इच्छाशक्ती असेल तर काम करू शकतो. माझ्याकडे इच्छाशक्ती आहे. मला कार्यकर्त्यांचा, नेत्यांचा आशीर्वाद आहे. काम करण्याची शक्ती माझ्यामध्ये आहे. केंद्रात कांद्यांच्या सदर्भात आंदोलन करणारा मी पहिला खासदार होतो. त्यामुळे खुडूक झालेल्या कोंबडीने काय फरक पडतो. खुडूक कोंबडी अंडे देणार नाही. अंडे न देणाऱ्या खुडूक कोंबडीला कोण स्वीकारणार?”, अशी बोचरी टीका सदाशिव लोखंडे यांनी भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर केली.