लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याआधी आज मुंबईत जोरदार राजकीय खडाजंगी रंगणार आहे. मुंबईत आज इंडिया आघाडीची बीकेसी येथील मैदानात आणि महायुतीची दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर सभा होणार आहे. महायुतीच्या सभेला पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसेअध्यक्ष राज ठाकरे एकाच मंचावर येतील. तत्पुर्वी शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी या सभेवर टीका केली. पंतप्रधान मोदी या निवडणुकीत जवळपास २५ वेळा राज्यात येऊन गेले आहेत. “विकास केला असता, महाराष्ट्रासाठी चांगल्या गोष्टी केल्या असत्या तर तुम्हाला शिव्या घातल्या, महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही म्हणून सांगितलं त्यांना आज मांडीवर बसवावे लागले नसते”, अशी टीका त्यांनी केली.
त्यांचं सुपारीचं दुकान बंद होणार
“आज भाजपाच्या मांडीला मांडी लावून जे (राज ठाकरे) बसत आहेत, ते स्वतःला महाराष्ट्राचे स्वाभिमानी वैगरे म्हणतात आणि त्यासाठी पक्ष स्थापन केला असेही सांगत होते. ते महाराष्ट्राच्या शत्रूंच्या बरोबर व्यासपीठावर बसतात आणि त्यांच्याबद्दल कौतुकाची फुले उधळणार, हे चित्र महाराष्ट्राला याची देही याची डोळा आज दिसेल. म्हणूनच आम्ही म्हणतो, या निवडणुकीनंतर सुपारीची काही दुकाने बंद होणार आहेत. यापैकी त्यांचेही एक दुकान असणार आहे”, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.
“राज ठाकरे यांची एक विशेषता आहे. ज्यांच्यावर ते प्रश्न उपस्थित करतात, त्यांच्याबरोबरच ते जातात. उत्तर भारतीयांविरोधात त्यांनी आंदोलन सुरू केल्यानंतर भाजपाने त्यांच्यासी नाते तोडले होते. मात्र आज पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्याबरोबर बसणार आहेत. एक राजकीय अनैतिकता सध्या दिसत आहे. राज ठाकरेंचे सुपारीचे दुकान पूर्णपणे बंद होईल. जनताच हे दुकान बंद होईल”, असेही ते म्हणाले.
संजय राऊत पुढे म्हणाले, “आज संध्याकाळी इंडिया आघाडीचीही सभा आहे. खरं म्हणजे शिवतीर्थावर आमची सभा व्हावी यासाठी आम्हीच पहिला अर्ज केला होता. आमची तिथे सभा होण्याची परंपरा आहे. पण केवळ आमची सभा होऊ नये म्हणून पंतप्रधान आणि काही सुपारीबाजांना बोलावण्यात आले. सत्तेचा गैरवापर केला गेला. पण ठिक आहे. आमच्या सभेत त्याचे उत्तर देऊ.” तसेच उद्या सकाळी १० वाजता हॉटेल ग्रँड हयात येथे इंडिया आघाडीची पत्रकार परिषद होणार असल्याचेही संजय राऊत यांनी सांगितले. इंडिया आघाडीच्या सभेसाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल आणि शरद पवार उपस्थित राहणार आहेत.
फडणवीस यांच्यामुळे भाजपाचे सर्वाधिक नुकसान
“महाराष्ट्रात पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्याविरोधात संतापाची एक लाट आहे. त्यापेक्षा अधिक संताप देवेंद्र फडणवीस यांच्या ढोंग आणि भंपकपणाविरुद्ध आहे. महाराष्ट्रात भाजपाचे सर्वाधिक नुकसान देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच होत आहे. महाराष्ट्रातील जनता त्यांचा द्वेष करते, हे तुम्हाला ४ जून रोजी कळेल”, अशीही टीका संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांनी केली.