मागच्या महिन्याभरापासून मुंबईतील उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात कोण उमेदवार असणार याची चर्चा रंगली होती. अखेर विद्यमान खासदार पूनम महाजन यांचा पत्ता कापून भाजपाने ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केली. त्यांना उमेदवारी मिळाल्यानंतर विरोधक टीका करत आहेत. निकम हे मुळचे जळगावचे असल्यामुळे भाजपाला उमेदवार आयात करावा लागला, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तर उबाठा गटाचे नेते किरण माने यांनीही फेसबुकवर पोस्ट टाकत, तसेच निकम्मा नाग असा हॅशटॅग देऊन उज्ज्वल निकम यांच्यावरी टीका केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले किरण माने?

किरण माने हे फेसबुकवर चांगलेच सक्रिय आहेत. विविध राजकीय घडामोडींवर ते आपल्या रोखठोक प्रतिक्रिया व्यक्त करत असतात. उबाठा गटात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या राजकीय भूमिकेला आणखीनच धार आलेली आहे. काल उज्ज्वल निकम यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर किरण माने यांनी फेसबुकवर पोस्ट टाकून टीका केली.

त्यांनी लिहिले, “महाराष्ट्रातल्या दोन पक्षांवर दरोडे पडले तेव्हा न्यूज चॅनल्स याच विद्वान वकिलाकडून एक्सपर्ट ओपिनियन घेत होते. हा भामटा पटवून देत होता की हे दरोडे कसे कायदेशीर आहेत. आत्ता समोर आला हा संविधानावर दरोडा घालू पहाणार्‍या टोळीला सामील झालेला निकम्मा नाग.”

उमेदवारी जाहीर होताच उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया, “भारताची प्रतिमा मोदींमुळेच जगात उंचावली”

फेसबुक प्रमाणेच इन्स्टाग्रामवरी एक पोस्ट टाकून किरण माने यांनी निकम यांच्यावर टीका केली. या पोस्टमध्ये त्यांनी निकम यांच्या पत्रकार परिषदेतील एक प्रश्न आणि त्यावर निकम यांनी दिलेले उत्तर उद्धृत केले आहे. “तुम्ही वर्षा गायकवाड यांचे आव्हान कसे पेलणार”, असा प्रश्न निकम यांना पत्रकाराने विचारला होता. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, “माझा जन्म हनुमान जयंतीचा आहे.” असला हास्यास्पद, बालीशबुद्धी, निकम्मा माणूस महाराष्ट्रात विद्वान कायदेतज्ज्ञ म्हणून आजवर मिरवत होता, अशी टीका किरण माने यांनी या पोस्टमध्ये केली.

संजय राऊत काय म्हणाले?

उज्ज्वल निकम यांना तिकीट दिल्यानंतर संजय राऊत म्हणाले, “माझ्या माहितीनुसार उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात भाजपाच्या अनेक नेत्यांनी उमेदवारी घेण्यास नकार दिला. त्या भागात कोणीही उमेदवारी घेण्यास तयार नव्हतं. उज्ज्वल निकम यांनी जळगावमधून उमेदवारी घ्यायला हवी होती. पण अर्थात तो त्यांचा प्रश्न आहे. आता या मतदारसंघात नक्कीच चांगली लढत होईल.”

भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”

दुसरीकडे तिकीट नाकारल्यानंतर पूनम महाजन यांनीही आपली प्रतिक्रिया दिली. लोकसभा निवडणूक घोषित झाल्यापासून पूनम महाजन सार्वजनिक मंचावर दिसल्या नव्हत्या. त्यांचे तिकीट कापले जाणार, याची कुणकुण त्यांना लागल्यामुळे त्यांनी जाहीर भाष्य करणे टाळले होते. त्यानंतर काल उज्ज्वल निकम यांना पक्षाने उमेदवारी दिल्यानंतर पूनम महाजन यांनी एक्स अकाऊंटवर पोस्ट टाकत आपल्या भावना व्यक्त केल्या.

त्या म्हणाल्या, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाने मागची १० वर्षे मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व करण्याची संधी मला दिली, त्याबद्दल मी धन्यवाद देते. खासदार म्हणून नाही तर मुलीप्रमाणे मला त्यांनी स्नेह दिला. मी माझ्या लोकसभा क्षेत्रातील कुटुंबीयांची, जनतेची ऋणी राहिन. माझे दैवत, माझे दिवंगत वडील प्रमोद महाजन यांनी मला राष्ट्रप्रथम मार्ग दाखवला. तोच मार्ग मला आयुष्यभर चालवता यावा, अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करते. माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण सदैव देशाच्या सेवेसाठी समर्पित असेल.”

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena ubt leader kiran mane criticized ujjwal nikam lok sabha election candidare from north central mumbai kvg