महायुतीच्या जागावाटपात परभणी लोकसभेचा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडे गेला. उबाठा गटाचे याठिकाणी विद्यमान खासदार असल्यामुळे हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाला मिळेल, अशी शक्यता होती. मात्र राष्ट्रवादीने त्यावर हक्क सांगितला आणि राष्ट्रीय जनता पक्षाचे नेते महादेव जानकर यांना याठिकाणी उमेदवारी दिली. महादेव जानकर यांनीही परभणीत तळ ठोकला असून प्रचाराची जोरदार सुरुवात केली आहे. त्यांच्या प्रचारावर आता विद्यमान खासदार आणि उबाठा गटाचे उमेदवार संजय जाधव यांनी टीका केली आहे.
जो आई-वडिलांना भेटत नाही, तो मतदारांना काय भेटणार?
परभणीत प्रचार सभेला संबोधित करताना संजय जाधव कार्यकर्त्यांना म्हणाले की, काळ कठीण आहे. सर्वांनी हुशारीने वागले पाहीजे. हे सरकार उलथवून टाकणे आपली नैतिक जबाबदारी आहे. “एकीकडे काही जण संविधान बदलण्याची भाषा बोलत आहेत. काहीजण पाच-पाच वर्ष मायबापाला (आई-वडिलांना) भेटत नाहीत, असं म्हणत आहेत. जर पाच-पाच वर्ष आई-वडिलांना भेटत नसाल तर मग पाच वर्ष मतदारांना कसे भेटणार?”, अशी टीका संजय जाधव यांनी केली.
‘भाजपाची संस्कृती घातक’, शिंदे गटाच्या खासदाराचा भाजपावर प्रहार; म्हणाले, “लोकसभाच ताब्यात…”
परभणीच्या बाहेरच्या व्यक्तीला उमेदवारी का?
महादेव जानकर यांना उमेदवारी दिल्याबद्दलही संजय जाधव यांनी आश्चर्य व्यक्त केलं. “महायुतीकडे जिल्ह्यात एकही माणूस नव्हता का? महादेव जानकरांसारखा साताऱ्याचा माणूस उमेदवार कशासाठी आणला? मग उद्या आम्ही छोट्या छोट्या कामासाठी साताऱ्याला जायचं का? आम्ही इथल्या मतदारांच्या रक्ता-मासाची माणसं आहोत. अर्ध्या रात्री जरी आम्हाला हाक दिली तर आम्ही उठून येऊ”, असे सांगताना जाधव यांनी मराठीतील एक म्हण सादर करून जानकरांना टोला लगावला. ते म्हणाले, “आपल्याच्या पायताणाला बसावं, पण शेजारच्या उशाला बसू नये” किंवा “जेवायला उकीरड्यावर बसावं, पण वाढ्या आपला असावा”, आम्ही तुमचेच वाढे आहोत. तुमच्या जीवनात एखादा वाईट प्रसंग येईल, तेव्हा तुमच्यासाठी मी अर्ध्यारात्री उठून येऊ, असा शब्द देतो.
“पक्ष फोडणाऱ्यांनीच ठरवलं कोण नकली, पण जनता..”, जयंत पाटील यांची अमित शाहांवर टीका
महादेव जानकर इथले स्थानिक नसल्यामुळे कोणत्या प्रश्नांवर मतं मागायची ? असा त्यांच्यासमोर प्रश्न असावा. म्हणूनच ते जाती-जातींमध्ये ध्रुवीकरण करून मतं मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही संजय जाधव यांनी यावेळी केला.