मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार भाजपा १५९ जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेसला केवळ ६८ जागांवर आघाडी घेण्यात यश आलं आहे. त्यामुळे २३० विधानसभा मतदारसंघ असलेल्या मध्य प्रदेशात भाजपाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. निवडणूक निकालाचे कल स्पष्ट झाल्यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या रणनीतीचा उल्लेख केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवराज सिंह चौहान म्हणाले, “नरेंद्र मोदी मध्य प्रदेशच्या जनतेच्या मनात आहेत. मोदींच्या मनातही मध्य प्रदेश आहे. त्यांनी मध्य प्रदेशात ज्या सभा घेतल्या, जनतेला आवाहन केलं ते जनतेच्या मनाला स्पर्श करून गेलं. त्यामुळेच हा निवडणूक निकालाचा कल समोर येत आहे. हेच या निकालाचं प्रमुख कारण आहे.”

“आमच्या कामाने जनतेची मनं जिंकली”

“दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने केलेल्या कामाची आम्ही मध्य प्रदेशमध्ये योग्यरीत्या अंमलबजावणी केली. तसेच मध्य प्रदेशमध्ये लाडली लक्ष्मीपासून लाडली बेहना अशा योजना आणल्या. त्यामुळे गरिबांसाठी, भाचे-भाच्यांसाठी काम झालं. या कामानेही जनतेची मनं जिंकली. तसेच मध्य प्रदेश एक कुटुंब बनला,” असं मत शिवराज सिंह चौहान यांनी व्यक्त केलं.

“अमित शाह यांची अचूक रणनीती आणि…”

“अमित शाह यांची अचूक रणनीती, त्याला मिळालेला प्रतिसाद, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं मिळालेलं मार्गदर्शन, संघटनेचं नेतृत्व आणि कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. त्यामुळे निवडणुकीला वेग आला. त्यामुळेच मी आधीही म्हटलं होतं की, आम्हाला स्पष्ट बहुमत मिळेल. कारण जनतेचं प्रेम सगळीकडे दिसत होतं,” असंही शिवराज सिंह यांनी नमूद केलं.

“‘लाडली बेटी’ने सर्व काटे काढले का?”

“‘लाडली बेटी’ने सर्व काटे काढले का?” असा प्रश्न विचारला असता शिवराज सिंह म्हणाले, “लाडली बेटीच नाही, तर लाडली लक्ष्मी, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्के आरक्षण, कन्या विवाह, पंतप्रधान मोदींची योजना प्रधानमंत्री मातृवंदना या सर्वांची प्रभावी अंमलबजावणी, ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’सारखे अभियान, संपत्तीची खरेदी करताना महिलांना नोंदणी शुल्कात सवलत, ३५ टक्के भरती यामुळे महिलांचं आयुष्य बदललं. त्यामुळे त्यांच्या मनात प्रेम आणि विश्वास निर्माण झाला.”

हेही वाचा : Madhya Pradesh Election Result 2023 Live : मध्य प्रदेशात काँग्रेसच्या वाट्याला निराशा?

निकालाच्या दिवशी शिवराज सिंहांची भोपाळ गॅस गळतीवर प्रतिक्रिया

निकालाच्या दिवशी भोपाळ गॅस गळतीवर बोलत शिवराज सिंह चौहान म्हणाले, “आजही २ आणि ३ डिसेंबरची रात्र आठवते तेव्हा अंगावर काटा येतो. गॅस गळतीमुळे भोपाळमध्ये लहान मुलांसह हजारो भाऊ आणि बहिणींचा जीव गेला. भोपाळचं ते दृश्य विसरलं जात नाही. त्यावेळी रस्त्यावर लोक आपला जीव वाचवण्यासाठी पळत होते. ते भयानक दृश्य असं होतं की, अनेक गायांचे पोट फुटले होते. पळता पळता अनेक लोक पडले आणि कायमस्वरुपी हे जग सोडून गेले.”