लोकसभा निवडणुकीचे निकाल जवळपास आता स्पष्ट होत आले आहेत. सध्या देशात इंडिया आघाडी २२९ जागांवर आघाडीवर आहे. तर भारतीय जनता पार्टी २९६ जागांवर आघाडीवर आहे. थोड्या वेळात सर्व निकाल स्पष्ट होतील. भाजपाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे मध्य प्रदेशातील विदिशा मतदारसंघातून तब्बल ८ लाखांहून अधिक मतांनी विजयी झाले आहेत.
शिवराज सिंह चौहान हे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांना या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने मध्य प्रदेशातील विदिशा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. यानंतर त्यांनी तब्बल ८ लाख १७ हजार मतांनी निवडणूक जिंकली आहे. हा विजय त्यांनी आपला नसून जनतेचा असल्याचं म्हटलं आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला हा विजय मिळाला आहे. मी जनतेला सलाम करतो, जनता माझ्यासाठी देव आहे. त्यांनी माझ्यावर इतके प्रेम दाखवले की मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही, अशी भावूक प्रतिक्रिया शिवराज सिंह चौहान यांनी दिली.
हेही वाचा : अजित पवार गटाचे उमेदवार सुनील तटकरे ८२ हजार ७८४ मतांनी विजयी; ठाकरे गटाचे अनंत गीते यांचा केला पराभव!
ते पुढे म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही विदिशा लोकसभा मतदारसंघाला एक आदर्श संसदीय मतदारसंघ बनवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. मध्य प्रदेशातील सर्व २९ जागा भाजपा जिंकेल, असा दावा करत एनडीए सलग तिसऱ्यांदा ३०० चा आकडा पार करेल, हाच जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास आहे”, असंही शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं.
दिल्लीत घडामोडींना वेग
लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता लवकरच चित्र स्पष्ट होईल. मात्र, त्याआधी एकीकडे इंडिया आघाडी आणि दुसरीकडे एनडीएने हालचाली सुरू केल्या असून उद्या दिल्लीत महत्वाच्या बैठका पार पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे इंडिया आघाडी आणि एनडीएच्या हालचालींकडे आता सर्वांच लक्ष लागलेलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोठा विजय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसी लोकसभा मतदारसंघातून मोठा विजय झाला आहे. काँग्रेसचे उमेदवार अजय राय आणि नरेंद्र मोदी यांच्यात अटीतटीची लढाई शेवटपर्यंत पाहायला मिळाली. पण अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ६ लाख १२ हजार ९७० मते मिळाली आहेत. तर अजय राय यांना ४ लाख ६० हजार ४५७ मते मिळाली आहेत. जवळपास दीड लाखांच्या फरकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी विजयी झाले आहेत. तर अजय राय यांचा पराभव झाला.