आज चंद्रपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. आपल्या सभेत त्यांनी इंडिया आघाडी, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली. कमिशनची मलई खाण्याचं काम महाविकास आघाडीने सत्तेत असताना केलं आणि महत्त्वाचे प्रकल्प ठप्प करुन टाकले अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आत्ताची लढाई ही स्थैर्य आणि अस्थिरतेचविरोधातली लढाई आहे.

“उद्यापासून गुढीपाडव्याचं नवं पर्व सुरु होतं आहे. सगळ्या बंधू भगिनींना गुढीपाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. २०२४ लोकसभा निवडणूक हा स्थैर्य आणि अस्थिरता यांच्यातला लढा आहे. एकीकडे भाजपा आणि एनडीए आहे. भाजपा आणि एनडीए देशासाठी महत्त्वाचे निर्णय घेते आहे. दुसरीकडे आहे काँग्रेस आणि त्यांची इंडी आघाडी. सत्ता भोगा आणि मलई खा हे त्यांचं ध्येय आहे. एक स्थिर सरकार किती आवश्यक असतं हे महाराष्ट्राशिवाय आणखी कुणाला जास्त समजणार? जोपर्यंत देशात देशात त्यांचं (इंडी आघाडी) सरकार होतं, महाराष्ट्राची उपेक्षाच होत राहिली” असा आरोप नरेंद्र मोदींनी केला. आज चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदींनी पहिली सभा घेत प्रचाराचा नारळ फोडला. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली.

मी शाही घराण्यातून आलेलो नाही

मी कुठल्याही शाही घराण्यातून आलेलो नाही. तुम्हीच मला इथवर आणलं आहेत. ज्या लोकांकडे घरं नव्हती असे लोक दलित, वंचित, आदिवासी होते. त्यांच्याकडे पिण्याचं पाणी नव्हतं. रस्ते, शिक्षण, सोयी सुविधा नव्हत्या. त्यामुळे मोदींनी गॅरंटी दिली होती की आमचं सरकार दलित, आदिवासी आणि मागास कुटुंबाचं आयुष्य बदलण्यासाठी काम करणार. आम्ही ते काम करुन दाखवलं, खूप मेहनत घेतली आणि चार कोटी लोकांना घरं मिळवून दिली, हे सगळे याच वर्गांमधले लोक आहेत. उज्ज्वला सिलिंडर योजना मिळालेलेही लोक हेच आहेत असंही नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- “…तेव्हा बाळासाहेब ठाकरे स्वत: काँग्रेसविरोधात उभे राहिले होते”, पंतप्रधान मोदींकडून काश्मीरचा उल्लेख करत हल्लाबोल!

नकली शिवसेनेचे लोक काँग्रेसला आणून रॅली करत आहेत

“आपल्या कर्मांमुळे काँग्रेस पक्षाने पाठिंबा गमावला आहे. काँग्रेस आता फोडा आणि राज्य करा हे धोरण अवलंबलं आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मुस्लीम लीगची भाषा आहे. हे देश स्वीकारणार आहे का? यांचे खासदार भारताच्या फाळणीची भाषा करत आहेत. इंडि आघाडीचे लोक दक्षिण भारत वेगळा करु म्हणत आहेत. द्रमुकचे लोक सनातन धर्माला डेंग्यू, मलेरिया म्हणत आहेत. अशा काँग्रेसच्या लोकांना नकली शिवसेनेचे लोक महाराष्ट्रात आणून रॅली करतात.

एकनाथ शिंदेच बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे घेऊन जात आहेत

“काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणाले मोदी देशात जिथे कुठे जातात तिथे काश्मीरबाबत का बोलतो? हा फाळणीचा विचार नाही का? छत्रपती शिवाजी महाराजांनी दिल्लीविरोधात भूमिका घेतली तेव्हा ते म्हणाले का दिल्लीत जे होतंय त्याचा माझा काय संबंध? लोकमान्य टिळक म्हणाले होते का की जालियनवाला बाग हत्याकांड आणि माझा काय संबंध? काश्मीरमध्ये जेव्हा काश्मिरी पंडितांची घरं जाळण्यात आली तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी काँग्रेसच्या विरोधात उभे राहात भूमिका घेतली होती. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे असं नाही म्हणाले की काश्मीरमध्ये आग लागली आहे तर महाराष्ट्रातल्या लोकांचा काय संबंध? काँग्रेससह आहे ती नकली शिवसेना आहे. मला आनंद आहे की एकनाथ शिंदेंची शिवसेना बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे घेऊन जात आहे.” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena with congress is duplicate shivsena said pm narendra modi in chandrapur rally speech scj