आगामी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. परंतु, जागा वाटपाचा तिढा अद्यापही संपलेला नाही. महाविकास आघाडी आणि महायुतीत लढत होणार आहे. परंतु, या दोन्ही आघाड्यांमध्ये असलेल्या घटकपक्षांमुळे जागा वाटपाचा तिढा सुटत नाहीय. आता सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातही महायुतीमध्ये मतभेद आहेत. या जागेवरून भाजपा आणि शिंदेंच्या शिवसेनेनेही दावा केला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांच्यात या जागेवरून जुंपली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आज पत्रकार परिषद घेऊन नारायण राणे यांनी या जागेवर दावा केला आहे. “सिंधुदुर्ग – रत्नागिरी मतदारसंघ भाजपाचाच आहे. या जागेसाठी मी कोणाशी बोलायला गेलो नाही. मला तिकिट द्या, असं मी माझ्या नेत्याला बोललेलो नाही. भाजपाचे जिल्हा परिषद, जिल्हा बँक, पालिकेत भाजपाची सत्ता आहे. ही सर्व ताकद असताना आम्ही हा मतदारसंघ सोडणार का? असा प्रश्न नारायण राणेंनी उपस्थित केला.

या जागेवर शिंदे गटाने उमेदवार देणार असल्याचं म्हटल्याने नारायण राणे म्हणाले, कोण उमेदवार? उदय सामंतचा उमेदवार कोण? मला त्यांच्या नावाला विरोध नाही. पण मी सांगतो येथे भाजपाचाच उमेदवार येणार”, असं नारायण राणेंनी स्पष्ट केलं.

उदय सामंत काय म्हणाले?

“या मतदारसंघाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात चर्चा झाली आहे. त्यामुळे या जागेबाबत तेच निर्णय घेतील. येत्या दोन दिवसांत सर्व शंकांचं निरसन होऊन ४८ च्या ४८ उमेदवारांची नावे जाहीर केली जातील”, असं उदय सामंत म्हणाले.

“या जागेवरून मागच्या वेळी शिवसेना लढली होती. या जागेवर आता शिवसेनेचा खासदार आहे. परंतु, ते दुसऱ्या गटात असल्याने ही जागा आता आम्हाला मिळायला हवी, त्यामुळे आम्ही येथे दावा केला आहे”, असं उदय सामंत म्हणाले.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Should we leave the seat when we have all the power asked narayan rane directly from ratnagiri sindhudurg constituency sgk