Jammu and Kashmir Assembly Election Result 2024 : अयोध्येतील पराभवानंतर भाजपाने वैष्णोदेवी जिंकलं; बलदेव शर्मा विजयी; काँग्रेस-पीडीपीची स्थिती काय?

Jammu and Kashmir Vidhan Sabha Election Result 2024 Updates : जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला बहुमत मिळत असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे.

Shri Mata Vaishno Devi consistency Jammu and Kashmir Assembly Election Result 2024
जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणूक निकाल २०२४ लाइव्ह (ANI/TIEPL)

Jammu and Kashmir Assembly Election 2024 Vote Counting Updates : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी चालू असून दुपारपर्यंत अनेक मतदारसंघांचे निकाल समोर आले आहेत. अनेक मतदारसंघांमध्ये अनपेक्षित निकाल लागले आहेत. तर काही मतदारसंघांमध्ये एक्झिट पोल्सच्या अंदाजाप्रमाणे व लोकांच्या अपेक्षेप्रमाणे निकाल लागले आहेत. श्री माता वैष्णोदेवी मतदारसंघात भाजपाने विजय मिळवला आहे. भाजपासाठी हा खूप दिलासादायक विजय आहे. कारण, लोकसभा निवडणुकीत भाजपाने उत्तर प्रदेशमधील अयोध्या मतदारसंघ (फैजाबाद) गमावला होता. लोकसभा निवडणुकीच्या काही महिने आधी म्हणजेच जानेवारी २०२४ मध्ये अयोध्येतील बहुप्रतीक्षित राम मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडला. यासाठी देशभरातून मान्यवरांना आमंत्रित करण्यात आलं होतं. भाजपाचं राजकारण गेल्या अनेक वर्षांपासून अयोध्येतील राम मंदिराच्या आसपास फिरत आलं आहे. अशातच भाजपा सरकारने मंदिर उभारल्याचा आणि मंदिराच्या भव्यदिव्य उद्घाट सोहळ्याचा पक्षाला लोकसभा निवडणुकीत फायदा होईल असं मानलं जाऊ लागलं होतं. पण निकाल मात्र याच्या उलट लागला. प्रत्यक्ष अयोध्येचा समावेश असणाऱ्या फैझाबाद मतदारसंघात भाजपाचा पराभव झाला.

श्री माता वैष्णो देवी मतदारसंघ यंदा नव्यानेच तयार करण्यात आला आहे. २०२२ साली जम्मू-काश्मीरमधील मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर रईसी व उधमपूर मतदारसंघांमधून श्री माता वैष्णो देवी विधानसभा मतदारसंघ स्वतंत्रपणे नव्याने अस्तित्वात आला आहे. या मतदारसंघात निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात मतदान पार पडलं होतं. या मतदारसंघाची निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने कुठलीही कसर सोडली नाही. तसेच अयोध्येतील पराभवानंतर भाजपाला कोणत्याही परिस्थितीत हा मतदारसंघ जिंकायचा होता. भाजपाने त्यांचं लक्ष्य साधलं आहे. भाजपा उमेदवार बलदेव शर्मा यांनी वैष्णोदेवी मतदारसंघात विजय मिळवला आहे. याआधी रईसी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणारे भाजपाचे उमेदवार बलदेव राज शर्मा यांच्यासमोर फार मोठं आव्हान नव्हतं.

हे ही वाचा >> Jammu and Kashmir Assembly Election Result 2024 Live : मेहबुबा मुफ्तींचा सरकारला पाठिंबा की विरोधी बाकावर बसणार? विधानसभेतील हाराकिरीनंतर मोठा निर्णय

भाजपाचे बलदेव शर्मा विजयी

श्री माता वैष्णो देवी मतदारसंघातील मतांची मोजणी पूर्ण झाली असून आठ फेऱ्यांमध्ये बलदेव शर्मा यांना १८,९१९ मतं मिळाली आहेत. तर, अपक्ष उमेदवार जुगल किशोर यांना १६,२०४ मतं मिळाली आहेत.. काँग्रेसच्या भूपींदर सिंह यांना ५,६५५, तर पीडीपीच्या शाम सिंह यांना ४,१९१ मतं मिळाली आहेत.

हे ही वाचा >> BJP in J&K Assembly Elections: अयोध्येनंतर आता भाजपाला वैष्णो देवी मतदारसंघाची धास्ती; थेट मंदिर ट्रस्टच्याच उमेदवाराशी सामना!

बलदेव शर्मा यांच्यासमोर सगळ्यात मोठं आव्हान होतं ते बारीदार अर्थात वैष्णो देवी मंदिराच्या रखवालदार समुदायाचं. आधी हा समुदाय भारतीय जनता पार्टीच्या बाजूने होता. परंतु, यंदा या समुदायानं शाम सिंह यांच्या रुपात त्यांचा स्वत:चा उमेदवार उभा केला होता.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shri mata vaishno devi consistency bjp baldev raj sharma jammu and kashmir assembly election result 2024 asc

First published on: 08-10-2024 at 15:40 IST

संबंधित बातम्या