अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघामध्ये आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. भारतीय जनता पक्षाचे आमदार माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांना भारतीय जनता पक्षाने पहिल्याच यादीमध्ये उमेदवारी जाहीर केली होती. मात्र आज प्रतिभा बबनराव पाचपुते यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि त्यांचा मुलगा भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचा प्रदेश उपाध्यक्ष विक्रमसिंह पाचपुते यांना उमेदवारी दिली. पक्षाचा एबी फॉर्म देखील विक्रम सिंह पाचपुते यांना मिळाला आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने शेवटच्या क्षणी आपला उमेदवार या मतदारसंघामध्ये बदलला असला तरी यामध्ये आईने मुलासाठी आपली उमेदवारी मागे घेतले आहे
माजी आमदारांची बंडखोरी
श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे माजी आमदार राहुल जगताप यांनी मात्र बंडखोरी केली आहे, त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता तो परत घेतला नाही. पक्षाकडून त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबत आदेश येऊनही त्याचे पालन राहुल जगताप यांनी केले नाही. यामुळेच या मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार अनुराधा नागवडे व राहुल जगताप हे दोघेही निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाले आहे.
लोकसभेला भाजप विधानसभेला वंचित आघाडी
श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघामध्ये अण्णासाहेब सिताराम शेलार हे अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष असून त्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार माजी खासदार सुजय विखे पाटील यांचे व्यासपीठावर जाऊन उघडपणे काम केले होते. मात्र यावेळी त्यांनी उमेदवारी न मिळाल्यामुळे वंचित बहुजन आघाडी या पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरला आहे, यामुळे महायुती देखील या मतदारसंघात बंडखोरी झाली आहे.
श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघांमध्ये आता १६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे, यामध्ये आठ उमेदवार पक्षाचे असून आठ उमेदवार अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. अनेकरंगी लढत या मतदारसंघामध्ये होत आहे.