लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रविवारी संध्याकाळी श्रीकांत शिंदे यांचा डेक्कन जिमखाना येथे कार्यकर्ता मेळावा पार पडला. कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. राज ठाकरेंनी सेना-भाजपा महायुतीला पाठिंबा दिल्याचा उल्लेख करत श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. तसेच, उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार विकण्याचं काम केल्याची टीकाही श्रीकांत शिंदे यांनी केली.
काय म्हणाले श्रीकांत शिंदे?
श्रीकांत शिंदे यांनी यावेळी बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. “महाराष्ट्र २० तारखेला वेगळं चित्र पाहणार आहे. एक ठाकरे धनुष्यबाणाला मत देणार आहेत आणि दुसरे ठाकरे हाताच्या पंजाला मतदान करणार आहेत. बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की मी माझ्या शिवसेनेची कधीच काँग्रेस होऊ देणार नाही. जेव्हा तसं होताना दिसेल, तेव्हा मी माझा पक्ष बंद करून टाकेन. पण त्यांच्या मुलाने बाळासाहेबांचे विचार विकून टाकण्याचं काम केलं”, असं श्रीकांत शिंदे म्हणाले.
“माझ्याशी विश्वासघात केला की, ईश्वर त्याचा सत्यानाश करतो”, देवेंद्र फडणवीसांचा रोख कुणाकडे?
दरम्यान, उद्धव ठाकरेंनी मुंबईतून काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आलेल्या वर्षा गायकवाड यांना मतदान करणार असल्याचं जाहीर सभेत सांगितलं होतं. आपल्या मतदारसंघातील उमेदवाराला आपण मत देणार असल्याचं ते म्हणाले होते. याचा संदर्भ देत श्रीकांत शिंदेंनी टोला लगावला. “जाहीर सभेत त्यांनी वर्षा गायकवाड यांना बाडूला बसवलं होतं आणि अभिमानाने सांगत होते की मी पंजाला मत देणार आहे”, अशा शब्दांत त्यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं.
“बाळासाहेब जिथे कुठे असतील…”
“दुसरे ठाकरे पंजाला मत देणार आहेत ही किती मोठी शोकांतिका आहे. बाळासाहेब, हिंदुत्व, सावरकरांचं नाव घेऊन ज्यांनी इतकी वर्षं राजकारण केलं, त्यांचे विचार विकण्याचं काम शिल्लक सेनेच्या प्रमुखांनी केलं. त्यांना आधीपासूनच काँग्रेसबरोबर जायचं होतं. जे काँग्रेसवाले सावरकरांना रोज शिव्या देतात, त्यांच्या मांडीला मांडी लावून हे बसले. त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा ठेवणार? बाळासाहेब जिथे कुठे असतील तिथून ते हे पाहात असतील”, असं श्रीकांत शिंदे म्हणाले.