Karnataka CM Latest News : कर्नाटकात काँग्रेसला अभूतपूर्व यश मिळालं असलं तरीही अद्यापही मंत्रिमंडळ तयार झालेलं नाही. सिद्धरामय्या आणि शिवकुमार या दोघांमध्ये मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू झाल्याने मंत्रिमंडळाचा पेच निर्माण झाला. गेल्या ४८ तासांपासून या दोघांनीही दिल्लीत ठाण मांडल्याने कर्नाटकचा पुढचा मुख्यमंत्री कोण याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदासाठी सिद्धरामय्या यांच्या नावावर शिक्कमोर्तब झाले आहे, अशी माहिती काँग्रेसचे सचिव के. सी. वेणुगोपाल यांनी दिली. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती. दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कर्नाटकात १० मे रोजी विधानसभा निवडणुकांसाठी मतदान झाले. तर, १३ मे रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाला. या निकालात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे कर्नाटकातील सत्तेच्या चाव्या आता काँग्रेसला मिळणार असल्याचे स्पष्ट आहे. परंतु, सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांच्यात मुख्यमंत्री पदावरून पेच निर्माण झाला होता. दोघेही पक्षातील ज्येष्ठ आणि अनुभवी नेते असल्याने मुख्यमंत्री पदाचे प्रकरण हायकमांडकडे गेले. निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेसने मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केला नव्हता. आधी निवडणूक होऊ द्या, मग मुख्यमंत्री ठरवू अशी भूमिका मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असलेल्या नेत्यांनी केल्याने निवडणूक प्रक्रिया यशस्वी पार पडली. परंतु, आता निकालानंतर मुख्यमंत्री पदाची खूर्ची कोणाच्या ताब्यात जाणार यावरून दोन्ही नेत्यांमध्ये संघर्ष निर्माण झाला.

काल काय घडलं?

सिद्धरामय्या यांनी बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास ‘दहा जनपथ’वर राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा लगेचच केली जाईल, असे संकेत पक्षाकडून देण्यात आले होते. मात्र मुख्यमंत्री होणार नसेल तर फक्त आमदार म्हणून पक्षासाठी काम करत राहीन, अशी ताठर भूमिका शिवकुमार यांनी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंशी झालेल्या दोन तासांच्या चर्चेमध्ये घेतल्यामुळे काँग्रेसला कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याचे नाव जाहीर करण्याचा निर्णय अखेरच्या क्षणी मागे घ्यावा लागला.

कर्नाटकच्या बहुतांश नवनियुक्त आमदारांनी पसंती दिल्यामुळे मुख्यमंत्रीपदी सिद्धरामय्यांची निवड निश्चित मानली जात होती. मात्र शिवकुमार यांनी बुधवारी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची ‘दहा जनपथ’वर भेट घेतली. तिथून शिवकुमार हे ‘दहा राजाजी’ रोडवरील खरगेंच्या निवासस्थानी गेले. त्यांच्यातील प्रदीर्घ चर्चेनंतर शिवकुमार यांनी, ‘मुख्यमंत्री पदासंदर्भात अजून कोणताही निर्णय झालेला नाही’, असे पत्रकारांना सांगितले. या विधानामुळे शिवकुमार माघार घेणार नसल्याचे स्पष्ट झाले. सिद्धरामय्यांनी दोन वर्षे मुख्यमंत्री पदी राहावे, त्यानंतर ३ वर्षे हे पद शिवकुमार यांना दिले जाईल वा सिद्धरामय्यांनी पाच वर्षे मुख्यमंत्री राहावे व शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्रीपद, महत्त्वाची खाती सांभाळावीत. तसेच, प्रदेशाध्यक्षपदीही कायम राहावे, असे दोन प्रस्ताव देण्यात आले आहेत. त्यातील एकही प्रस्ताव शिवकुमारांनी स्वीकारलेला नाही.

नेमकं काय ठरलं?

दरम्यान, काल झालेल्या बैठकांनंतर मुख्यमंत्रीपदी सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्रीपदी डी. के. शिवकुमार यांची निवड झाली आहे. सिद्धरामय्या हे कर्नाटकचे मुख्यमंत्री असतील. तर, डी. के. शिवकुमार हे उपमुख्यमंत्री असतील, अशी माहिती वेणुगोपाल यांनी दिली. तसंच, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्रिमंडळातील मंत्री २० तारखेला शपथग्रहण करतील, असंही त्यांनी पुढे सांगितलं.

आज पुन्हा बैठक

काँग्रेसने गुरुवारी सायंकाळी सात वाजता बंगळुरूमध्ये काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या केंद्रीय निरीक्षकांना सीएलपी बैठक आयोजित करण्यासाठी बंगळुरूत पोहोचण्यास सांगण्यात आले आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Siddaramaiah to be next karnataka cm dk shivakumar to be his deputy sources sgk