कर्नाटक विधानसभेत स्पष्ट बहुमत येऊनसुद्धा मुख्यमंत्रीपद कुणाला द्यायचे हे अद्याप काँग्रेसला ठरवता आलेले नाही. दिल्ली येथे दोन दिवसांपासून सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांच्याशी काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. बुधवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांना अनपेक्षितरीत्या मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा मिळाला. माजी मंत्री डॉ. के. सुधाकर आणि एसटी सोमशेखर हे दोघे २०१९ साली काँग्रेस-जेडीएसमधून फुटलेल्या १७ आमदारांपैकी आहेत. सिद्धरामय्या यांच्यामुळेच जेडीएस-काँग्रेसचे सरकार पडले, असा आरोप या दोन नेत्यांनी केला आहे. दोघेही वोक्कलिगा समाजाचे नेते आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमारदेखील याच समाजातून येतात. फुटून बाहेर पडल्यानंतर भाजपा सरकारमध्ये सुधाकर वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रिमंडळाचा कारभार पाहत होते, तर सोमशेखर सहकारमंत्री होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुधाकर यांनी ट्वीट करून सदर आरोप केला आहे. त्यांनी म्हटले, “२०१८ साली जेडीएस-काँग्रेसच्या सरकारमध्ये समन्वय समितीचे अध्यक्ष सिद्धरामय्या होते. त्यांच्याकडे आमदार जेव्हा जेव्हा त्यांचे प्रश्न घेऊन जायचे, तेव्हा तेव्हा सिद्धरामय्या माझ्या हातात काहीच नाही, असे उत्तर देत असत. माझ्या स्वतःच्या मतदारसंघातील आणि जिल्ह्यातील कामे होत नाहीत, अशी खंत सिद्धरामय्या स्वतः बोलून दाखवीत असत.”

हे वाचा >> Karnataka: २०१९ साली बंडखोरी करून जेडीएस-काँग्रेसचे सरकार पाडणाऱ्या त्या ‘१७’ आमदारांचे काय झाले? किती जिंकले, हरले? 

यापुढे त्यांनी म्हटले की, त्यापुढे जाऊन सिद्धरामय्या आम्हाला म्हणाले की, २०१९ च्या लोकसभा निवडणुका होईपर्यंत वाट पाहा. निवडणुका झाल्यानंतर एच. डी. कुमारस्वामी यांना एकही दिवस पदावर राहू देणार नाही, अशी भावना त्यांनी बोलून दाखवली. अखेरीस आमच्यातील काही आमदारांनी कार्यकर्ते आणि मतदारसंघातील समर्थकांच्या हिताचे रक्षण करण्याच्या अपरिहार्यतेतून काँग्रेस पक्ष सोडून पोटनिवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. काँग्रेस आमदारांनी त्या वेळी घेतलेल्या निर्णयामागे सिद्धरामय्या यांची सूचक किंवा स्पष्ट भूमिका होती, हे ते नाकारू शकतात काय?

भाजपाचे नेते सोमशेखर यांनीदेखील फेसबुक पोस्ट टाकून याबद्दल प्रतिक्रिया देताना म्हटले, “जेडीएस-काँग्रेसच्या आघाडी सरकारच्या काळात समन्वय समितीचे अध्यक्ष असतानाही सिद्धरामय्या नेहमीच आमदारांसमोर अगतिकता व्यक्त करून दाखवायचे. त्यांच्या या वागण्यामुळेच काही आमदारांना राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे लागले, हे कुणीही नाकारू शकत नाही.”

हे वाचा >> कर्नाटकचे संभाव्य मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार; दोघांचा राजकीय इतिहास जाणून घ्या

२०१३ ते २०१८ या काळात मुख्यमंत्री असताना सिद्धरामय्या यांनी अशाच प्रकारच्या आरोपांचा सामना केलेला आहे. विशेष करून कुमारस्वामी यांनी असे आरोप केले होते. २०१३ च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी अशीही अफवा पसरली होती की, के. सुधाकर आणि सोमशेखर हे भाजपाला सोडून पुन्हा काँग्रेसमध्ये येऊ शकतात. मात्र तसे झाले नाही. सुधाकर यांना चिक्कबळ्ळापूरमधून काँग्रेसच्या प्रदीप ईश्वर यांनी पराभूत केले आहे. तर सोमशेखर यांनी यशवंतपूर येथून विजय मिळवला.

कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी काँग्रेसकडून घोषणा होण्याच्या काही तासांआधीच भाजपाच्या या दोन नेत्यांनी हा आरोप केला आहे. वोक्कलिगा संघ, ही वोक्कलिगा समाजाची महत्त्वाची संघटना आहे. या संघटनेने नुकतीच एक बैठक घेऊन शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्यासंबंधीचा एकमताने ठराव केला. हा ठराव काँग्रेस पक्षश्रेष्ठी यांच्यापर्यंत पोहोचवला जाणार आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Siddaramaiah was behind fall of congress jds govt in 2019 says bjp leader k sudhakar kvg