सिक्कीम विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून सत्ताधारी सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा (SKM) या सत्ताधारी पक्षाने राज्यातील ३२ पैकी ३१ जागा जिंकल्या आहेत. सिक्कीमचे मुख्यमंत्री आणि एसकेएमचे नेते प्रेमसिंह तमांग यांनी त्यांच्या रेनॉक मतदारसंघात सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंटचे (SDF) प्रतिस्पर्धी सोमनाथ पौड्याल यांच्यावर सात हजार ४४ मतांनी विजय मिळवला आहे. तर, गेल्या १० वर्षांपासून देशाची सत्ता हाती असलेल्या भाजपाला सिक्कीममध्ये खातंदेखील उघडता आलेलं नाही. दरम्यान, सिक्कीममधील विरोधी पक्ष सिक्कीम डेमोक्रेटिक फ्रंटला एका जागेवर समाधान मानावं लागलं आहे. सिक्किममध्ये भाजपाप्रमाणे काँग्रेसची पाटीदेखील कोरीच आहे.

दरम्यान, भारतीय फुटबॉल संघाचे माजी कर्णधार बायच्युंग भूतिया यांना राजकीय मैदानात पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला आहे. भूतिया हे बारफुंग विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मात्र सत्ताधारी सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाचे उमेदवार रिक्शल दोरजी भूतिया यांनी बायच्युंग भूतिया यांच्यावर ४,३४६ मतांनी मात केली आहे.

दिग्गज फुटबॉलपटू बायच्युंग भूतिया यांनी २०१८ मध्ये तृणमूल काँग्रेस पक्षातून बाहेर पडून स्वतःच्या राजकीय पक्षाची स्थापना केली होती. हमरो सिक्कीम पार्टी असं या पक्षाचं नाव होतं. मात्र चार वर्षांमध्ये या पक्षाला राजकारणात फारशी लोकमान्यता मिळाली नाही. परिणामी गेल्या वर्षी त्यांनी त्यांचा पक्ष एसडीएफमध्ये विलीन केला. ते सध्या एसडीएफचे उपाध्यक्ष देखील आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत एसडीएफने १५ जागा जिंकल्या होत्या. हा पक्ष राज्यात प्रमुख विरोधी पक्ष आहे. दरम्यान, भूतिया यांच्या पक्षाने यंदाच्या निवडणुकीत अवघी एकच जागा जिंकली आहे.

हे ही वाचा >> Exit Poll : अमेठी, रायबरेलीत कोण जिंकणार? राहुल गांधी, स्मृती इराणींच्या मतदारसंघात काय घडणार?

१० वर्षांत सहावा पराभव

बायच्युंग भूतिया यांनी यापूर्वी तृणमूल काँग्रेसच्या तिकीटावर पश्चिम बंगालमधून दोन निवडणुका लढवल्या आहेत. त्यांनी २०१४ मध्ये दार्जिलिंगमधून लोकसभेची तर २०१६ मध्ये सिलिगुडी येथून विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र या दोन्ही निवडणुकांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा सिक्कीमकडे वळवला. त्यांनी २०१९ मध्ये गंगटोक आणि तुमेन-लिंगे मतदरसंघातून विधानसभा निवडणूक लढवली. मात्र या दोन्ही मतदारसंघात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर झालेल्या गंगटोक विधानसभेच्या पोटनिवडणुकीतही त्यांचा पराभव झाला. दरम्यांन, यावेळी ते सहाव्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मात्र या निवडणुकीतही त्यांचा पराभव झाला आहे. राजकारणाच्या मैदानातील गेल्या १० वर्षांतील भूतिया यांचा हा सहावा पराभव आहे. भूतिया यांनी मोठ्या कष्टाने फुटबॉलमध्ये यश मिळवलं. मात्र राजकारणात त्यांना गेल्या १० वर्षांपासून संघर्ष करावा लागत आहे.