राहुल गांधी लोकसभा निवडणूक अमेठीतून लढणार की रायबरेलीतून लढणार हा सस्पेन्स आता संपला आहे. कारण काँग्रेसने रायबरेली या मतदारसंघातून राहुल गांधी लढणार हे जाहीर केलं आहे. रायबरेली आणि अमेठी या दोन मतदारसंघातले दोन उमेदवार काँग्रेसने जाहीर केले आहेत. राहुल गांधी अमेठीतून लढणार नाहीत त्यामुळे भाजपाने त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. अमेठीच्या खासदार आणि भाजपाच्या नेत्या स्मृती इराणींनीही राहुल गांधींवर टीका केली आहे. काँग्रेस पक्षाने पराभव मान्य केला आहे त्यामुळेच राहुल गांधींना रायबरेलीतून उमेदवारी देण्यात आली आहे असं स्मृती इराणी म्हणाल्या आहेत.
काँग्रेसने जाहीर केली यादी
काँग्रेसने रायबरेलीतून राहुल गांधी लढणार तर अमेठीतून के. एल. शर्मा लढणार आहेत, हे जाहीर केलं आहे. राहुल गांधी २०१९ पर्यंत अमेठीतून निवडणूक लढत होते. मात्र यावेळी पक्षाने त्यांचा मतदारसंघ बदलला आहे. २०१९ मध्ये स्मृती इराणींनी राहुल गांधींना अमेठीतून हरवलं होतं. आता त्यांनी राहुल गांधींवर आणि काँग्रेसवर टीका केली.
स्मृती इराणी काय म्हणाल्या?
स्मृती इराणी म्हणाल्या, “अमेठीतून लढणाऱ्या पाहुण्या उमेदवारांचं मी स्वागत करते. अमेठीतून गांधी कुटुंबातल्या कुणीही न लढणं याचाच अर्थ काँग्रेसने पराभव मान्य केला आहे. निवडणूक होण्याआधी, मतं मिळण्याआधीच काँग्रेस पक्ष पराभूत झाल्याच्या मानसिकतेत गेला आहे. जर राहुल गांधींना हे वाटत असतं की आपण निवडणूक जिंकणार तर ते अमेठीतून उभे राहिले असते.”
हे पण वाचा VIDEO : “घाबरू नका…”, राहुल गांधींना रायबरेलीतून उमेदवारी मिळाल्यानंतर नरेंद्र मोदींचा खोचक टोला
आणखी काय म्हणाल्या स्मृती इराणी?
“२०१९ मध्ये अमेठीच्या जनतेने गांधी परिवाराला नाकारलं होतं. त्यामुळेच राहुल गांधींचा अमेठीतून पराभव झाला. २०२४ ची निवडणूक सुरु आहे आणि तिसऱ्या टप्प्याच्या आधी गांधी परिवाराने अमेठीतून माघार घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात विकास झाला आहे. अमेठीची जनता हे विचारते आहे की जर अमेठीचा विकास पाच वर्षांत होऊ शकला तर इतक्या वर्षांत काँग्रेसकडे ही जागा असताना का झाला नाही? “
काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, निवडणुका लागायच्या दोन महिने आधीच मी सांगितलं होतं की, यांच्या सर्वात मोठी नेत्या निवडणूक लढवण्याची हिंमत करणार नाहीत. त्या घाबरून पळून जाणार. त्या पळून राजस्थानात गेली आणि राजस्थानातून राज्यसभेत आल्या. आता राहुल गांधी यांनीही अमेठीऐवजी रायबरेलीतून लढण्याचा निर्णय घेतला आहे. “मी आधीच सांगितलं होतं की यांचे युवराज वायनाडमध्ये हरणार आहेत. आणि हरण्याच्या भितीने वायनाडमध्ये मतदान संपल्यावर ते तिसरी जागा शोधायला सुरुवात करतील.”
अमेठी आणि रायबरेलीत काँग्रेस विरोधात भाजपा
दरम्यान, भाजपाने अमेठी आणि रायबरेली या दोन्ही जाागांसाठी उमेदवारांची घोषणा केली असून अमेठीतून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना तर रायबरेलीतून दिनेश प्रताप सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. २०१९ मध्ये रायबरेलीतून सोनिया गांधी यांनी दिनेश प्रताप सिंह यांचा पराभव केला होता.