लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी येत्या २६ एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर या टप्प्यातील मतदारसंघांमधला प्रचार थांबला आहे. मात्र, राष्ट्रीय स्तरावर इतर टप्प्यांसाठी मतदान आणि प्रचार मात्र चालू आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाकडून आज निवडणुकीसाठीचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. या जाहीरनाम्यात काही प्रमुख मुद्द्यांचा समावेश शरद पवार गटाडून करण्यात आला आहे. या जाहीरनाम्याला शरद पवार गटाने शपथनामा असं नाव दिलं आहे. या शपथनाम्यात शेतकऱ्यांसाठीही तरतुदी करण्यात आल्या आहेत. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका केली आहे.
शेतकऱ्यांच्या अडचणींवर काम करण्यासाठी स्वतंत्र आयोग निर्माण केला जाईल. त्यात सरकारचा राजकीय हस्तक्षेप नसेल. शेती आणि शैक्षणिक वस्तूंवर शून्य जीएसटी केला जाईल, अशी घोषणा शरद पवारांनी केली. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “शरद पवार कृषीमंत्री होते, चार वेळा मुख्यमंत्री होते. मग त्यांच्यावर अशी वेळ का आली? अडीच वर्षे त्यांच्याकडे सरकार होतं. गेल्या दोन वर्षांत शेतकऱ्यांना दिलेला मोबदला आम्ही दिला. १५ हजार कोटी अतिवृष्टी आणि गारपीटीच्या काळात दिले. एक रुपयात पिक विमा योजना दिली. सर्वांत जास्त शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहणार सरकार आमचं आहे, असं शिंदे म्हणाले. छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
राहुल गांधींना लॉन्च करू शकले नाहीत
काँग्रेसला जाहीरनामा प्रसिद्ध करण्याचा अधिकारी नाही. त्यांनी ५०-६० वर्षे देशाला खड्ड्यात टाकलं. या देशाला अधोगतीकडे नेण्याचं काम २०१४ पूर्वी झालं. भ्रष्टाचार, दंगली, बॉम्बस्फोट झाले. त्याचा हिशोब त्यांनी दिला पाहिजे. २०१४ नंतर एकही बॉम्बस्फोट झाला नाही. त्यामुळे लोकांनी आता ठरवंल आहे की अब की ४०० पार. देशाला पुढे न्यायचं असेल, महासत्तेकडे न्यायाचं असेल तर मोदींशिवाय पर्याय नाही. मोदींच्या नेतृत्त्वात इस्रोने चांद्रयान लॉन्चिंग केलं. काँग्रेसने प्रयत्न करून इतक्या राहुलजीचं लॉन्चिंग करू शकले नाहीत.
हेही वाचा >> Video: शरद पवार गटाचा जाहीरनामा प्रकाशित; जातनिहाय जनगणना, महिला आरक्षणासह ‘या’ प्रमुख मुद्द्यांचा केला समावेश!
विरोधकांकडून अपप्रचार
मुस्लिम समाजाला व्होट बँक म्हणून वापरलं. पण त्यांना गरीब म्हणूनच ठेवलं. आम्ही संविधान बदलणार असं ते म्हणतात. कारण त्यांच्याकडे दुसरं काही राहिलं नाही. संविधान बदलणार हा खोटा अपप्रचार सुरू आहे. मोदींनी स्पष्ट खुलासा केला आहे की सूर्य-चंद्र असेपर्यंत बाबासाहेबांचं संविधान कोणी बदलू शकणार नाही. नरेंद्र मोदींनी बाबासाहेबांचा संविधान दिन साजरा करायला सुरुवात केली, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.