ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मतदानाच्या दिवशी मतदारांना उद्देशून महत्त्वाचं आवाहन केलं आहे. अण्णा हजारे यांनी केलेलं वक्तव्य चर्चेतही आलं आहे. अहमदनगरमध्ये सुजय विखे पाटील विरुद्ध निलेश लंके असा सामना आहे. नगरमध्ये पैसे वाटप झाल्याचा आरोप निलेश लंकेंनी केला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर अण्णा हजारेंचं वक्तव्य चर्चेत आहे.
अण्णांनी बजावला मतदानाचा हक्क
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज राळेगणसिद्धीमध्ये त्यांचा मतदानाचा हक्क बजावला. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. या संवादात त्यांनी चाव्या योग्य हातांमध्ये द्या असं म्हटलं आहे. तसंच आजच्या दिवशी मतदारांची जबाबदारी फार महत्त्वाची आहे असंही अण्णा हजारे म्हणाले आहेत. ज्यांना मतदान करायचे त्यांनी मागच्या काळात काय केले ते पाहणे महत्त्वाचे आहे. तो मतदारसंघासाठी किती झिजला, दिव्यासारखा किती जळला हे पाहणे गरजेचे आहे. ते पाहूनच मतदान करा, असं अण्णा म्हणाले आहेत.
अण्णा हजारेंनी काय दिला संदेश?
मत देताना उमेदवार आचारशील, विचारशील, निष्कलंक जीवन, अपमन सहन करण्याची शक्ती हे गुण पाहिजे. तो दिव्यासारखा झटत राहिला पाहिजे. मतदाराने ज्यांना मतदान करायचे त्याचे चारित्र्य कसे आहे. त्याचे आचार- विचार कसे आहे? त्याचे जीवन निष्कलंक आहे का? दाग लागलेले आहे का? हे पाहिले पाहिजे. खरी लोकशाही आणायची असेल तर मतदारांची जबाबादारी महत्त्वाची आहे.
मतदान केले पाहिजे. मी पक्ष पाहत नाही स्त्री किंवा पुरुष असेल तरी त्याचे चारित्र्य चांगले पाहिजे. हा देश कोणी चालवायचा त्याची चावी कोणाच्या हातात द्यायची हे ठरवायचे आपल्या हातात आहे. मतदाराच्या हाती चावी आहे. योग्य चावी लावली पाहिजे. चावी चुकीच्या हातात गेली तर देशाचे वाटोळे होईल.
प्रत्येकाने मतदान केलंच पाहिजे असंही आवाहन
आज प्रत्येक नागरिक मतदानाचा हक्क बजावणार आहे. या देशासाठी अनेक लोकांनी प्राणाचे बलिदान दिले, तुरुंगवास भोगला, फासावर गेले. १८५७ ते १९४७ तब्बल ९० वर्षे बलिदान देत या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. ते स्वातंत्र्य आबाधित ठेवायचे असेल तर मतदाराची जबाबदारी फार महत्त्वाची आहे. जागृत मतदार हाच लोकशाहीचा आधार आहे. मतदार जागरुक होईल त्याचदिवशी देशामध्ये लोकशाही खऱ्या अर्थाने येईल, असंही अण्णा हजारेंनी म्हटलं आहे. अण्णा हजारेंच्या या वक्तव्याची चर्चा होते आहे. तसंच आज त्यांनी राळेगणसिद्धीमध्ये मतदानाचा हक्क बजावला आणि त्यानंतर मतदारांना हे महत्त्वाचं आवाहन केलं आहे.