उत्तर प्रदेशमध्ये येत्या सात मार्च रोजी शेवटच्या टप्प्याचं मतदान होणार असून १० मार्च रोजी पाच राज्यांमध्ये मतमोजणी होणार आहे. त्यामुळे शेवटच्या टप्प्यासाठीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना काही गोष्टींमुळे वाद देखील निर्माण होताना दिसत आहे. नुकतंच समाजवादी पक्षाचे उमेदवार अब्बास अन्सारी यांनी केलेल्या एका विधानामुळे उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे. जोपर्यंत अधिकाऱ्यांचा हिशोब चुकता होत नाही, तोपर्यंत त्यांच्या बदल्या होणार नसल्याचं अब्बास अन्सारी म्हणाले आहेत. यासंदर्भात दाखल झालेल्या तक्रारीनंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय म्हणाले अब्बास अन्सारी?
अब्बास अन्सारी हे उत्तर प्रदेशच्या मऊ जिल्ह्यातून विधानसभा निवडणूक लढवत आहेत. त्यांनी गुरुवारी एका प्रचारसभेत बोलताना सरकारी अधिकाऱ्यांच्या बदलीसंदर्भात केलेल्या एका विधानानंतर खळबळ उडाली आहे. “मी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना सांगून आलो आहे की येत्या सहा महिन्यांत कोणत्याही अधिकाऱ्याची बदली होणार नाही. आधी त्यांच्यासोबत हिशोब केला जाईल. जो इथे आहे, तो इथेच राहील. आधी सगळ्यांचा हिशोब होईल. त्यानंतरच त्यांच्या बदलीच्या कागदपत्रांवर सही होईल”, असं अब्बास अन्सारी म्हणाले आहेत.
दरम्यान, अब्बास अन्सारी यांच्या विधानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. “अब्बास अन्सारी यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओनंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात पुढील कारवाईसंदर्भात आम्ही अहवाल सादर केला आहे”, अशी माहिती मऊचे पोलीस अधीक्षक सुशील घुले यांनी दिली आहे.
“यांना ‘भैय्या भूषण’ पुरस्कार द्यायला हवा”, संजय राऊतांच्या ‘त्या’ विधानावर मनसेचा खोचक टोला!
कोण आहेत अब्बास अन्सारी?
अब्बास अन्सारी हे सुहेलदेव भारतीय समाज पार्टी आणि समाजवादी पक्षाच्या आघाडीचे उमेदवार आहेत. उत्तर प्रदेशमध्ये एकेकाळी गँगस्टर असलेले मात्र नंतर राजकीय जीवनात कार्यरत झालेले मुख्तार अन्सारी यांचे ते पुत्र आहेत.