उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकींचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. दोनच दिवसांत पहिल्या टप्प्यासाठी मतदान होणार असून त्याआधी सपा आणि भाजपा यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. नोएडामधील समाजवादी पक्षाचे उमेदवार सुनील चौधरी यांनी स्थानिक भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांकडून छळ होत असल्याची तक्रार केली आहे. इतकंच नव्हे, तर पोलिसांकडून योग्य ती कार्यवाही न झाल्यास कुटुंबीयांसह स्वत:ला पेटवून घेण्याचा इशाराच त्यांनी दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुनील चौधरी यांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवून भाजपाकडून जाच होत असल्याची तक्रार केली आहे. यासोबतच, त्यांनी स्थानिक पोलिसांकडून देखील छळ केला जात असल्याचं म्हटलं आहे. “भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून छळ होत असल्याची वारंवार तक्रार केल्यानंतर देखील स्थानिक पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही”, अशी तक्रार त्यांनी पत्रात केली आहे.

पोलीसच कार्यकर्त्यांचा छळ करत असल्याचा आरोप

रविवारी भाजपा आणि सपाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्यानंतर सुनील चौधरी यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे. “मी एका सामान्य कुटुंबातला असून प्रामाणिकपणे निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, स्थानिक सत्ताधारी भाजपाला पाठिंबा देणाऱ्या पोलिसांनी आमच्या कार्यकर्त्यांचा छळ करणं सुरू ठेवलं आहे. त्यांना मारहाण केली जाते, धमकावलं जातं, मध्यरात्री त्यांच्या घरांची झडती धएतली जाते”, असं सुनील चौधरी म्हणाले आहेत.

भाजपाकडून मात्र आरोप फेटाळले

दरम्यान, भाजपाने मात्र सुनील चौधरी यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. “गुंडांच्या पक्षानं धमक्या मिळत असल्याचा दावा करणं हे विशेष आहे. हा फक्त मतांची बेगमी करण्यासाठीचा एक प्रयत्न आहे”, असं भाजपाचे नोएडा जिल्हा अध्यक्ष मनोज गुप्ता यांनी म्हटलं आहे.