केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा आज (१६ मार्च) जाहीर केल्या. देशात एकूण सात टप्प्यांत लोकसभेची निवडणूक पार पडणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेत सात टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीची सविस्तर माहिती दिली. तसेच लोकसभा निवडणुकीसोबतच चार राज्यांची विधानसभेची निवडणूकदेखील होणार आहे. यामध्ये ओडिशा, अरुणाचल प्रदेश, आंध्र प्रदेश आणि सिक्किम या राज्यांचा समावेश आहे.
चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा
अरुणाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, ओडिसा आणि सिक्कीम या चार राज्यांतील विधानसभा निवडणुकांची घोषणा आज निवडणूक आयोगाने केली. तसेच या चारही राज्यांच्या निवडणुकीचे वेळापत्रकही प्रसिद्ध केले. आंध्र प्रदेशमध्ये १३ मे रोजी एका टप्प्यात निवडणूक होणार आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये १९ एप्रिलला मतदान होईल. तर सिक्कीममध्ये १९ एप्रिलला एकाच टप्प्यात निवडणूक होईल. तर ओडिशामध्ये दोन टप्प्यात मतदान होणार आहे.
हेही वाचा : महाराष्ट्रात पाच टप्प्यात होणार निवडणूक; कोणत्या जिल्ह्यांत कधी होणार मतदान? जाणून घ्या
ओडिसात दोन टप्प्यात निवडणुका
लोकसभा निवणुकीसोबतच चार राज्याच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. या चार राज्यांपैकी ओडिसात दोन टप्प्यात निवडणुका पार पडणार आहेत. यामध्ये पहिल्या टप्प्यात १३ मे रोजी मतदान होईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यांसाठी २० मे रोजी मतदान होईल. यानंतर ४ जून २०२४ रोजी मतमोजणी पार पडेल. देशात १९ एप्रिलपासून लोकसभा निवडणूक सुरू होणार आहे. यामध्ये संपूर्ण देशात सात आणि महाराष्ट्रात पाच टप्प्यांत निवडणूक होणार आहे. दरम्यान, यावेळी लोकसभेला जवळपास देशात ९६ कोटी मतदार असणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. तसेच यामध्ये १.८ कोटी नवमतदार हे पहिल्यांदा मतदान करणार आहेत.